Soybean Farming : भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावर्षी देशात सरासरी पेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा अंदाज व्यक्त होत आहे.
खरंतर सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तथा उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.
एका शासकीय आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी चाळीस टक्के उत्पादन हे आपल्या महाराष्ट्र राज्यात घेतले जाते आणि महाराष्ट्र राज्याचा उत्पादनाच्या बाबतीत देशात दुसरा क्रमांक लागतो.
दुसरीकडे मध्य प्रदेश हे राज्य उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे तिथे सोयाबीन उत्पादनापैकी 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते. यावरून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण हे सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, जर तुम्ही ही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण सोयाबीनच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
JS 2034 सोयाबीन वाण : जेएस 2034 हे सोयाबीनचे एक सुधारित वाण आहे. या जातीच्या दाण्यांचा रंग पिवळा, फुलांचा रंग पांढरा आणि शेंगांचा आकार सपाट असतो. या जातीची पेरणी कमी पाऊस असतानाही करता येते.
कमी पाऊस असलेल्या ठिकाणी सुद्धा शेतकरी या जातीची पेरणी करून जास्त उत्पादन घेऊ शकतात. सोयाबीन JS 2034 जातीचे एक हेक्टरमध्ये सुमारे 24-25 क्विंटल उत्पादन मिळते. हे पीक 80-85 दिवसात परीपक्व होते. या जातीच्या पेरणीसाठी एकरी ३० ते ३५ किलो बियाणे लागते.
बीएस ६१२४ : सोयाबीनच्या या जातीची आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड होते. या जातीच्या पेरणीसाठी प्रति एकर 35-40 किलो बियाणे आवश्यक असते. उत्पादनाबाबत बोलायचे झाले तर एका हेक्टरमध्ये या जातीपासून सुमारे २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळू शकते. ही जात तयार होण्यासाठी ९० ते ९५ दिवस लागतात. या जातीची फुले जांभळ्या रंगाची आणि पाने लांब असतात.
JS 2069 : जर तुम्ही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणीच्या तयारीत असाल तर या जातीची पेरणी करू शकता. या जातीच्या पेरणीसाठी एकरी ४० किलो बियाणे लागते. या जातीपासून एक हेक्टरमध्ये सुमारे 22-26 क्विंटल उत्पादन मिळू शकते. ही जात तयार होण्यास ८५ ते ८६ दिवस लागतात.