Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पेरणी केली जाते.
उत्तर महाराष्ट्रात देखील सोयाबीन पीक लागवडीखालील क्षेत्र पाहायला मिळते. हेच कारण आहे की, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
एका शासकीय आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा वाटा जवळपास 40% एवढा आहे. मध्यप्रदेश राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते आणि त्या खालोखाल आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो.
यावरून आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. मात्र असे असले तरी सोयाबीन उत्पादकांच्या माध्यमातून सोयाबीन पिकातून अलीकडे अपेक्षित असे उत्पादन त्यांना मिळत नसल्याची तक्रार होत आहे.
हवामान बदलामुळे, अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे, सोयाबीन पिकावर येणाऱ्या कीटकांमुळे आणि रोगांमुळे सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांना आता फारसे उत्पादन मिळत नाही.
अनेकदा तर शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही. अशातच आपल्या दमदार कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पत्नीचे उदाहरण देत सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवण्याचा बीज मंत्र सांगितला आहे.
रोडकरी नावाने प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते विकासाच्या प्रकल्पांमध्ये मोठी भूमिका निभावली आहे. त्यांच्या दूरदृष्टीने देशभरात विविध महामार्गाचे जाळे तयार झाले आहे.
त्यांनी एखादे काम हाती घेतले तर ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे विरोधक देखील त्यांच्या कामाची स्तुती करतात हे विशेष. दरम्यान, विरोधकांना आपल्या कामाची भुरळ पाडणारे नितीन गडकरी आपल्या पत्नीच्या शेतीमधल्या कामगिरीने विशेष प्रभावित झाले आहेत.
नितीन गडकरी यांची पत्नी सोयाबीन पिकातून एकरी 11 क्विंटल पर्यंतचे सोयाबीन उत्पादन मिळवत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. नितीन गडकरी यांनी असे सांगितले आहे की, ‘माझ्याकडे तीन विहिरी आहेत, तेथे बारा तास वीज पुरवठा सुरू असतो. यामुळे माझी 60 एकर जमीन पाण्याखाली आली आहे.
माझ्या पत्नीला दोन पुरस्कार मिळाले. एक मिळाला अकरा क्विंटल एकरी सोयाबीन उत्पादन घेतल्याबद्दल.’ एकंदरीत पाण्याचे शाश्वत स्त्रोत असल्यामुळे आणि बारा तास वीजपुरवठा उपलब्ध असल्याकारणाने नितीन गडकरी यांच्या पत्नी सोयाबीन पिकातून एकरी 11 क्विंटल पर्यंतचे विक्रमी उत्पादन मिळवत असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे.