Soybean Farming : तुम्हीही यंदा सोयाबीनची लागवड केली आहे का ? मग तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. याची महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात याची शेती होते. हे महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादित होणारे पीक आहे.
यामुळे सोयाबीन पिकाच्या देशाच्या एकूण उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एका अधिकृत आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 45% उत्पादन मध्य प्रदेश राज्यात होते आणि 40 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते.
म्हणजेच एकूण उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सोयाबीनची खरीप हंगामात लागवड केली जाते. उन्हाळ्यातही सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते मात्र उन्हाळ्यात फक्त बीज उत्पादनासाठी याची लागवड होत असते.
याची व्यावसायिक लागवड ही फक्त खरीप हंगामात केली जाते. सध्या खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. अशाच या महत्त्वपूर्ण अवस्थेत सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याचे आढळले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीनचे पीक पिवळे पडले असून यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिकात लोह या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास पीक पिवळे पडते. दरम्यान जर तुमचेही सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर यावर तुम्हाला ताबडतोब उपाययोजना करावी लागणार आहे.
कारण की सोयाबीनचे पीक पिवळे पडले तर याचा पीक वाढीवर विपरीत परिणाम होतो. यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती असते. अशा परिस्थितीत पिवळे पडल्यानंतर लगेचच यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दरम्यान, आज आपण सोयाबीनचे पीक पिवळे पडल्यानंतर कोणत्या औषधाची फवारणी केली पाहिजे, यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात? या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय उपाययोजना केल्या पाहिजेत ?
गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये शेतात पाणी साचले आहे. जर तुमच्याही सोयाबीनच्या वावरात पाणी साचले असेल तर ते पाणी आधी बाहेर काढा.
पाणी बाहेर काढल्यानंतर शेतात वाफसा स्थिती निर्माण होईल. वाफसा कंडीशन तयार झाल्यानंतर फेरस सल्फेट ०.५ टक्के (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) औषधाची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
किंवा ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.