Soybean Farming : मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे लवकरच मान्सून केरळात दाखल होणार असा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार केरळात मान्सूनचे 28 मे ते 3 जून या कालावधीत आगमन होणार आहे.
तसेच राज्यात 9 ते 16 जून या कालावधीत मानसून आगमन होईल असा अंदाज आहे. एकंदरीत लवकरच मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात खरीप हंगामातील पीक पेरणीला वेग येणार आहे.
सध्या शेतकरी बांधव बी बियाणे, खत खरेदीसाठी धावपळ करत आहेत. शेत जमिनीची पूर्व मशागत देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
यामुळे यावर्षी सोयाबीन आणि कापूस लागवडी खालील क्षेत्र वाढेल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान जर तुम्ही येत्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे.
कारण की आज आपण सोयाबीनच्या अलीकडेच विकसित झालेल्या तीन प्रमुख जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या टॉप तीन जातींची माहिती पाहणार आहोत.
पी डी के व्ही आंबा : या जातीला एएमएस 100-39 म्हणून ओळखले जाते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे वाण शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. मराठवाडा आणि विदर्भात या वाणाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. हे एक उच्च उत्पादन देणारे वाण आहे. या जातीच्या सोयाबीनला तीन दाण्यांच्या शेंगा भरपूर प्रमाणात लागतात.
विशेष म्हणजे पेरणीनंतर या जातीचे पीक लवकर तयार होते. लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होत असल्याने शेतकऱ्यांना या जातीपासून चांगली कमाई होत आहे. तसेच या जातीची पेरणी केल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी देखील वेळेवर करता येणे शक्य होते.
पी डी के व्ही पूर्वा : डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आणखी एक सुधारित वाण म्हणजेच पी डी के व्ही पूर्वा. याला एएमएस 2014-1 या नावाने ओळखले जाते. जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागात या जातीपासून चांगले उत्पादन मिळू शकते.
पी डी के व्ही येलो गोल्ड : या जातीला ए एम एस 1001 या नावाने ओळखले जाते. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत या जातीची लागवड केली तर चांगले उत्पादन मिळते. या जातीची निश्चित ते मध्यम पर्जन्यमान असणाऱ्या भागात लागवड केली पाहिजे.
या जातीपासून इतर प्रचलित वाणांपेक्षा अधिकचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीची देखील राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते. महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल असल्याचे आढळले आहे.