Soybean Crop Management : पांढरं सोनं म्हणून ख्यातीप्राप्त कापूस आणि पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची लागवड आपल्या राज्यात सर्वाधिक केली जाते. हे दोन्ही पिके पावसाळी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात.
दोन्ही हंगामात या पिकांची लागवड होत असली तरीदेखील खरिपामध्ये म्हणजेच पावसाळ्यात या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र या दोन्ही पिकांची एकरी उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
कापसाचा विचार केला तर कापूस लागवडीखालील क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात गुजरात राज्यापेक्षा अधिक आहे. परंतु उत्पादनाचा विचार केला तर कापसाच्या उत्पादनात देशामध्ये गुजरातचा पहिला क्रमांक लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
अर्थातच आपल्या राज्यात कापसाची उत्पादकता कमी आहे. सोयाबीनच्या बाबतीत देखील असच आहे. सोयाबीनची एकरी उत्पादकता देखील कमी झाली आहे. यामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे.
यासाठी शेतकरी बांधवांना सोयाबीन पेरणी करताना काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा स्थितीत आज आपण सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना कोणता सल्ला दिला आहे याविषयी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीन पेरणी करताना ही दक्षता घ्या
सोयाबीनच्या सुधारित जातींची निवड करा.
रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड करा.
टोकन पद्धतीने सोयाबीनची पेरणी करा. यामुळे बियाणे कमी प्रमाणात लागेल. साहजिकच असे केले तर उत्पादन खर्चात बचत होणार आहे.
बीजोपचार करूनच बियाण्याची पेरणी करा. बीजोपचार करून जर पेरणी केली तर सुरुवातीच्या टप्प्यात पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या कीटकांपासून आणि रोगांपासून पीक संरक्षित केले जाऊ शकते.
मान्यताप्राप्त दुकानदाराकडून बियाणे खरेदी करा. बियाणे खरेदी करताना दुकानदाराकडून बियाणे खरेदीची पावती घ्या. यामुळे जर बियाणे बोगस निघाले तर पुढे दाद मागता येऊ शकते.
प्रतिष्ठित कंपनीचे बियाणे असो किंवा घरगुती बियाणे पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून पहा.
बियाण्याची उगवण क्षमता 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल तेच बियाणे पेरणीसाठी वापरा. 60% पेक्षा कमी उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरू नका अन्यथा पीक उत्पादनात मोठी घट येऊ शकते.
सोयाबीन पेरणी करतांना ओळ ते ओळ अंतर 45 सें.मी. ठेवा. सोयाबीनची शास्त्रीय लागवड करण्यासाठी हे अंतर योग्य आहे.
यासोबतच बियाणे 2-3 सें.मी. खोलवर पेरणी करा. यापेक्षा खोल बियाणे पेरू नका. अन्यथा बियाण्याची उगवण होणार नाही.
बियाणे पेरणी करताना रोपं ते रोपं अंतर 5-10 सें.मी.ठेवा. किमान 70% उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापराच याशिवाय, बियाण्याचा दर 65-70 किलो/हेक्टर एवढा ठेवा.