Soybean And Cotton Rate : कापूस आणि सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची लागवड राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. कापसाबाबत बोलायचं झालं तर कापसाची लागवड खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच सोयाबीनची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात होत असून देशात सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्रात 40 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते. मध्यप्रदेश या राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो.
कापूस उत्पादनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो आणि महाराष्ट्रानंतर गुजरात या राज्याचा क्रमांक लागतो. म्हणजेच सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांवर आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मात्र सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. याचे कारण म्हणजे या दोन्ही शेतमालांना अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. गेल्या दोन वर्षांपासून या दोन्ही शेतमालांचे भाव दबावत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
यंदा तर परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की मध्यंतरी सोयाबीन आणि कापूस हमीभावापेक्षा कमी दरात विकावा लागला होता. दरम्यान केल्या काही दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस बाजार भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, आता हंगामाच्या शेवटी तरी कापसाला चांगला भाव मिळणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.
सोयाबीन बाजाराचे चित्र कसे राहणार ?
गेल्या काही दिवसांपासून पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचे बाजार भाव स्थिर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काल अर्थातच 10 एप्रिल ला देशातील अनेक प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसरीकडे, काल बाजरातील आवक घटली होती. प्रक्रिया प्लांट्सच्या भावाबाबत बोलायचं झालं तर काल प्रक्रिया प्लांट्समध्ये ४ हजार ७५० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला आहे. जागतिक बाजारात मात्र सोयाबीन दरात चढ उतार पाहायला मिळाली आहे.
तथापि बाजार अभ्यासाकांनी पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये देशातील बाजारात बाजारभावात आणखी सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली आहे. निश्चितच बाजार भाव आणखी सुधारलेत तर याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कापूस बाजाराचे चित्र कसं राहणार
सध्या कापसाच्या वायद्यांमधील चढ-उतार कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान काल देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये पांढऱ्या सोन्याची आवक कमी झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. काल, कापसाची ६० हजार गाठी एवढी आवक झाली होती.
पणनच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, कालच्या बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे. पण, कापुस बाजारातील तज्ञ लोकांनी आगामी काळात कापूस भावात सुधारणा होणे अपेक्षित असल्याचे यावेळी म्हटले आहे.