Soybean And Cotton Farming : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. यामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती. कापूस आणि सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांना पाहिजें तसे उत्पादन मिळाले नव्हते. विशेष म्हणजे हवामान बदलाचा सामना करून उत्पादित केलेल्या सोयाबीन आणि कापसाला बाजारातही कमी भाव मिळाला. काही शेतकऱ्यांना तर हमीभावापेक्षा कमी दारात कापूस आणि सोयाबीनची विक्री करावी लागली.
यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेत. परिणामी खरीप हंगाम 2023 मध्ये उत्पादित केलेल्या कापसाला आणि सोयाबीनला अनुदान दिले गेले पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली. विशेष म्हणजे याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. शिंदे सरकारने गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असे आश्वासन दिले.
लोकसभा निवडणुकीआधीच शिंदे सरकारने हे आश्वासन दिले होते. शिंदे सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार असे म्हटले होते. याबाबतची अधिकृत घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात देखील करण्यात आली. दरम्यान या घोषणेनंतर आता याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपयांची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जसे की जर एका शेतकऱ्याने दोन हेक्टर क्षेत्रात कापूस आणि दोन हेक्टर क्षेत्रात सोयाबीन लागवड केली असेल तर त्याला दोन्ही पिकांसाठी मदत मिळणार का? म्हणजे शेतकऱ्याला कमाल 20000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण की या संदर्भात शासन निर्णयात कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान आता याच संदर्भात आता कृषी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी मोठी माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या शेतकऱ्याने दोन हेक्टर मध्ये कापूस आणि दोन हेक्टर मध्ये सोयाबीन लागवड केली असेल तर त्याला कापसासाठी दहा हजार आणि सोयाबीन साठी दहा हजार असे एकूण 20000 रुपये मिळणार आहेत. सरकार लवकरच ही मदत कशी वितरित करायची याबाबतची माहिती देणार असेही अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले आहे.
एक हेक्टर पेक्षा कमी लागवड असेल तर किती अनुदान मिळणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी 20 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीत पिकांची लागवड केली असेल तर त्यांना एक हजार रुपये, एक एकर क्षेत्रावर लागवड केली असेल तर दोन हजार रुपये, दीड एकर क्षेत्रावर लागवड केली असेल तर तीन हजार रुपये, दोन एकर क्षेत्रावर लागवड केली असेल तर चार हजार रुपये, तसेच अडीच एकर म्हणजेच एक हेक्टर जमिनीवर लागवड केली असेल तर पाच हजार रुपये मिळणार आहेत. ही मदत दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत मिळणार आहे.