Soyabean Farming : भारतीय हवामान विभागाने नुकताच यंदा मान्सून काळात पाऊसमान चांगले राहणार असा अंदाज दिला आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढू शकते असा अंदाज तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. सोयाबीन हे एक प्रमुख नगदी पीक असून याची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात होते.
शेतकरी बांधव उन्हाळी हंगामात याची बीजोत्पादनासाठी लागवड करतात मात्र याची कमर्शियल लागवड अर्थातच व्यावसायिक शेती ही खरीप हंगामातच होते.
दरम्यान यावर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये चांगल्या मान्सूनची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र आपल्या महाराष्ट्रातही वाढणार असा अंदाज तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागला आहे.
देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सोयाबीन लागवड केली जाते. दरम्यान, राज्यासहित देशभरातील अनेक प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी कृषी संशोधक वेगवेगळ्या जाती तयार करत आहेत.
तेलबिया उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्नरत असलेल्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून अशीच एक सोयाबीनची नवीन जात विकसित करण्यात आली आहे. सोयाबीनच्या या नवीन जातीपासून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळणार असा दावा केला जात आहे.
देशातील कृषी शास्त्रज्ञांनी सोयाबीन एनआरसी १५२ ही नवीन जात विकसित केली आहे. सोयाबीनची ही नवीन जात दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे. कारण की, ही जात कमी पाण्यातही चांगले उत्पादन देऊ शकते असा दावा तज्ञांनी केलेला आहे.
विशेष म्हणजे कमी कालावधीत या जातीचे पीक तयार होते. तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, एनआरसी 152 या जातीची पेरणी केल्यानंतर तीन महिन्यांनी अर्थातच 90 दिवसात पीक हार्वेस्टिंग साठी तयार होऊ शकते.
ही नवीन जात मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या जातीपासून हेक्टरी 38 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळू शकते असा दावा कृषी संशोधकांनी यावेळी केला आहे.
सोयाबीन NRC 152 च्या या नवीन जातीचे बियाणे तुम्ही तुमच्या जवळच्या बियाणे कंपनीकडून खरेदी करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सोयाबीन संशोधन संस्थेशी (आयआयएसआर) संपर्क साधू शकता.