Soyabean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते आणि मध्य प्रदेश राज्यात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते.
यामुळे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश राज्याचा एक नंबर लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक. यावरून राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या सोयाबीन या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून असल्याचे पाहायला मिळते.
मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये हवामानातील बदलांमुळे सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होऊ लागले आहे. कारण की, सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान सोयाबीन उत्पादकांसाठी भारतीय वैज्ञानिक नवनवीन सोयाबीन वाण तयार करत आहेत. असाच एक नवीन वाण मध्यप्रदेश मधील ICAR-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोयाबीन संशोधन, इंदूर या संस्थेने विकसित केला आहे.
या नव्याने विकसित झालेल्या जातीची विशेषता म्हणजे सोयाबीनचा हा नवा वाण फक्त 90 दिवसात काढणीसाठी तयार होतो. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळते. अशा परिस्थितीत, आता आपण सोयाबीनच्या या नव्याने विकसित झालेल्या जाती विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीनचा नवीन वाण
आज आपण ज्या नव्याने विकसित सोयाबीन जातीची माहिती जाणून घेणार आहोत त्या सोयाबीन जातीचे नाव आहे NRC 152. ही सोयाबीनची जात ICAR-भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदूर (मध्य प्रदेश) या संस्थेने विकसित केली आहे.
या कृषी विद्यापीठाने या जातीची शिफारस मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील बुदेलखंड प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या विभागासाठी केली आहे.
NRC 152 नावाची वाण लवकर परिपक्व, अन्न गुणांसाठी योग्य आणि नॉन-न्यूट्रिटिव्ह क्लुनिट्झ ट्रिपिंग इनहिबिटर आणि लिपॉक्सीजनेज ऍसिड-2 सारख्या अनिष्ट गुणांपासून मुक्त आहे.
सोयाबीनचा हा नव्याने विकसित झालेला वाण अवघ्या तीन महिन्यात म्हणजेच 90 दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होतो. विशेष म्हणजे यातून विक्रमी उत्पादन मिळते.
या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 38 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. महाराष्ट्रातील हवामानात सोयाबीनची ही जात चांगली वाढते आणि विक्रमी उत्पादन देते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या जातीची लागवड फायदेशीर ठरणार आहे.