Solapur News : सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रेत वर्षानुवर्ष भाकणूक वर्तवण्याची रुढी असून ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी परंपरा आज देखील कायम आहे. दरम्यान यावर्षीचा भाकणुकीतला अंदाज नैसर्गिक आपत्तीचा जोर कायम राहणार असल्याचे सांगत आहे.
भाकणुकीचा अंदाज वर्तवण्याचे मानकरी राजशेखर हिरेशेब्बू हे आहेत. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील भाकणुकीकडे सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. दरम्यान आज आपण या भाकणुकीत मानकरी राजशेखर यांनी कोण-कोणते अंदाज आणि भाकणूक वर्तवली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा सोलापूर येथील भाकणुकीमधील अंदाज
ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यंदाच्या यात्रेत वर्तवलेल्या भाकणुकीनुसार, यावर्षी पाऊस मान चांगला राहणार आहे. मुबलक पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भाकणूकित वर्तवण्यात आला आहे. मात्र या वर्षी नैसर्गिक आपत्तीचे संकेत देखील असल्याचे मानकरी राजशेखर यांनी सांगितले. भाकणुकीचा अंदाज वर्तवण्यासाठी भाकणूक स्थळी असलेले वासरू चांगलेच बिथरले असल्याने हा अंदाज बांधण्यात आला आहे.
खरं पाहता या भाकणुकीतील अंदाजावर महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य जनतेचा प्रगल्भ विश्वास आहे. यामुळे सदर भाकनुकीप्रमाणे पाऊसमान चांगला राहिला तर शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळेल. मात्र नैसर्गिक आपत्ती कायम राहणार असल्याने कुठे ना कुठे ही एक धोक्याची घंटा देखील आहे.
मानकरी हिरेहब्बू यांनी नैसर्गिक आपत्ती बाबत माहिती देताना सांगितलं की, यापूर्वी किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळी वर्तवणूक करण्यात आलेली भाकणूक प्रसंगी ज्या पद्धतीने वासरू बिथरलं होतं अगदी त्याच पद्धतीने यंदाच्या भाकणुकीत वासरू बिथरलं आहे.
यामुळे नैसर्गिक आपत्तीचे संकेत असल्याचे समजते. भाकणुकस्थळी असलेले वासरू दिवसभर उपाशी होते. पण त्याला गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकाराचे धान्य ठेवण्यात आले त्यावेळी त्याने कशालाच स्पर्श केला नाही. म्हणजेच जीवनावश्यक वस्तूंचे दर यावर्षी स्थिर राहणार असल्याचा हा सिद्धेश्वराचा कौल आहे.