Skymet Weather Update : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे चक्रीवादळात रूपांतरित झाले. या नवीन चक्रवादळाला मिचँग असे नाव देण्यात आले. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
प्रामुख्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. चेन्नईमध्ये तर मुसळधार पावसामुळे पूरस्थिती तयार झाली. परिणामी सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. आपल्या राज्यातही या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हलका ते मध्यम पाऊस झाला. पण बहुतांशी भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होता.
तथापि ढगाळ हवामानामुळे आणि रिमझिम पावसामुळे शेती पिकांवर थोडासा विपरीत परिणाम पाहायला मिळाला. आता मात्र राज्यातील हवामानात मोठा चेंज आला आहे. बंगालच्या उपसागरामधील चक्रीवादळ शमले असल्याने अवकाळी पावसाने आता विश्रांती घेतली असून राज्यात आता थंडीची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे.
तथापि अजूनही राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे अजून म्हणावी तशी थंडी पडत नाहीये. गेल्या दोन दिवसांपासून मात्र राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.
तर दुसरीकडे हवामान खात्यातील तज्ञांनी 11 डिसेंबर पासून ते 13 डिसेंबर पर्यंत राज्यात पुन्हा एकदा रिमझिम स्वरूपाचा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अशातच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशातील जवळपास 19 राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, आगामी 24 तासात ईशान्य भारतात पावसाच्या हालचाली दिसणार आहेत.
तसेच पुढील ४८ तासांचा विचार केला असता या कालावधीमध्ये नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.
अरुणाचल प्रदेशात सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय झारखंड, बिहार, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे.
छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर देखील हलका पाऊस पडणार असे Skymet ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.