Skymet Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.द्राक्ष डाळिंब केळी यांसारख्या फळ पिकांचे आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर याचा विपरीत परिणाम होत आहे.
शिवाय, रांगडा कांदा पिक देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.आधीच खरीप हंगामात कमी पावसामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळालेले नाही. अशातच आता राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे.
दरम्यान गेल्या महिन्यापासून सुरू झालेला हा अवकाळी पाऊस आणखी काही दिवस महाराष्ट्रात तांडव घालणार आहे. आगामी 24 तास महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या भागात आज जोरदार वारे वाहतील असे देखील सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या तीन जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय उद्या अर्थातच आठ डिसेंबरला मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय उर्वरित राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान देखील राहणार आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.
स्कायमेट ने दिलेल्या अंदाजानुसार, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, दक्षिण बिहार आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल. तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे.
पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, पूर्व तेलंगणा, आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा आणि अंदमान निकोबार बेटांवर देखील हलका ते मध्यम पाऊस पडणार असे Skymet ने स्पष्ट केले आहे.
मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सुद्धा एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, मराठवाडा, पूर्व उत्तर प्रदेशातही हलका पाऊस पडणार असल्याचे स्कायमेटने स्पष्ट केले आहे.
यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचे आणि पशुधनाची काळजी घ्यावे असे जाणकार लोकांनी सांगितले आहे.