Skymet Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात फारसा पाऊस झाला नाही.
गेल्या महिन्यात केवळ चार ते पाच दिवस पावसाची हजेरी लागली. विशेष म्हणजे राज्यातील काही मोजक्याच भागात पाऊस बरसला. यामुळे खरीप हंगामातील पिकांवर याचा मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे. खरिपातील पिके अक्षरशः करपण्याच्या अवस्थेत आली होती.
मात्र आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झालेली नाही. तसेच ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे त्या ठिकाणी अजूनही फार मोठा पाऊस झालेला नाही.
दोन दिवसांपूर्वी पुणे व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाची हजेरी लागली. मात्र उर्वरित भागात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
स्कायमेटने वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार राज्यात 6 सप्टेंबर पासून अर्थातच आज पासून ते 9 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच येत्या शनिवार पर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होणार असे स्कायमेटने स्पष्ट केले आहे. तसेच 9 सप्टेंबर नंतर राज्यातील कोकण विभागात पाऊस पडणार असे सांगितले जात आहे.
यामुळे आता हे चार दिवस राज्यात पाऊस होतो की नाही हे पाहण्यासारखे राहणार आहे. जर या कालावधीत राज्यात पाऊस पडला नाही तर दुष्काळाचे सावट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. Skymet ने म्हटल्याप्रमाणे, सध्या ईशान्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे परिचलन आहे.
त्याच्या प्रभावाखाली कमी दाबाचे क्षेत्र आता अतितीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवसात कोरड्या राहिलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे. राज्यात 6 सप्टेंबर पासून ते नऊ सप्टेंबर पर्यंत सर्व दूर मुसळधार पाऊस होणार आहे. यानंतर मात्र हा पाऊस कोकण विभागाकडे वळेल आणि त्या भागापुरताच मर्यादित राहील असे सांगितले जात आहे.
येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार या भागात आगामी काही दिवस जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे.