Skymet 2024 Monsoon : गेल्या वर्षी मानसून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. अनेक ठिकाणी पावसाळ्यात एकदाही चांगला जोरदार पाऊस झाला नाही.
यामुळे, ऐन हिवाळ्यातच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाली आहेत. दुसरीकडे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
हवामान तज्ञांनी एलनिनोमुळे गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे एल निनोमुळे यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र राहणार अशी शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2023 प्रमाणे यंदाचा मान्सून शेतकऱ्यांशी दगाफटका करणार का ? 2024 चा पावसाळा कसा राहणार ? असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान याच संदर्भात स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने मोठी माहिती दिली आहे.
काय म्हणतंय स्कायमेट ?
अमेरिकन हवामान संस्था नोआने एल निनोचा प्रभाव आता हळूहळू कमी होत जाईल आणि यामुळे यंदाच्या पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. नोआपाठोपाठ आता स्कायमेटने देखील यंदाचा पावसाळा कसा राहणार ? याबाबत मोठी माहिती दिली आहे.
Skymet म्हणतंय की, यंदा एप्रिल अखेरपर्यंत एल निनो निवळणार आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यावर एलनिनोचा प्रभाव पाहायला मिळणार नाही. असे झाल्यास यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
देशात सरासरीच्या 94 ते 104% एवढा पाऊस हजेरी लावेल, अर्थातच यंदा देशात सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याबाबत स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी देखील मोठी माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पॅसिफिक महासागरातील थंड वातावरणामुळे ला निना मजबूत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे. मात्र, हा हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेचा प्राथमिक अंदाज आहे.
यामुळे जेव्हा एप्रिल महिन्यात भारतीय हवामान खात्यासहित इतर हवामान संस्थेचा सुधारित अंदाज जाहीर होईल तेव्हाच आगामी पावसाळ्याबाबत योग्य ती माहिती समोर येऊ शकणार आहे.