Shettale Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांचे जीवनमान उंचावले जावे यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
राज्यात विविध शेतकरी हिताच्या योजना सुरू असून यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा देखील समावेश होतो. दरम्यान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्याची बाब आता महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित झाली असून यासाठी आता शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत आज आपण वैयक्तिक शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते, शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदानाची रक्कम किती असते, यासाठीच्या पात्रता काय, कोण कोणते कागदपत्रे लागतील याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वैयक्तिक शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते
यापूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत 50 हजाराचे अनुदान मिळत होते मात्र आता ही रक्कम जास्तीत जास्त 75000 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
जर शेतकऱ्यांनी अस्तरीकरणासह अर्ज केला तर मात्र अनुदानाची ही रक्कम दीड लाखापर्यंत जाते. यामध्ये शेतकऱ्यांना आकारमानानुसार अनुदान दिले जाते.
15×15×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 28 हजार 275 रुपये, 20×25×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 31 हजार 598, 20×20×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 41 हजार 218 रुपये, 25×20×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 49 हजार 671, 25×25×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 58 हजार 700 रुपये, 30×25×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 67 हजार 728, 30×30×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 75 हजार रुपये एवढे अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
योजनेसाठीच्या पात्रता
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल क्षत्र मर्यादा लावून देण्यात आलेली नाही.
ज्या शेतकऱ्यांनी आधीच वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेतलेला आहे, अशा शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा पुन्हा लाभ घेता येणार नाही.
कोण कोणती कागदपत्रे लागणार
या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्र सादर करावी लागतात. यात जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला, पासपोर्ट फोटो यांसारख्या आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.