Shetkari Karjmafi : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे फायर ब्रँड नेते आता आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बॅटल फिल्डवर उतरले आहेत.
महायुती मधील घटक पक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी प्रचार सभांचा धडाका सुरू केला आहे. यामुळे सर्वत्र राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून ऐन हिवाळ्यात तापदायक असे वातावरण सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. महाविकास आघाडी मध्ये समाविष्ट असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रचारात उडी घेतली आहे.
त्यांची विधानसभा निवडणुकीतली पहिली सभा छत्रपती संभाजी नगर मध्ये झाली. यावेळी त्यांनी वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा सुद्धा केली आहे.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आम्हाला लोक शहरातील म्हणतील, पण आम्हाला शेतकऱ्यांचे दुःख कळते. आमचे सरकार आले की शेतक-यांच्या कर्जमाफीचा पहिला निर्णय घेणार आहोत अशी मोठी घोषणा केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी या जाहीर सभेत बोलताना, ‘आमचं सरकार होतं त्यावेळी नागपुरात पहिला निर्णय शेतकरी कर्ज माफीचा घेतला, तेव्हा काही मंत्री म्हणाले होते की हा निर्णय आता नाही तर निवडणूक आली तेव्हा घेऊ पण साहेबांनी (उद्धव ठाकरे) सांगितले मी निवडणूक पाहून नाही तर जनतेसाठी निर्णय घेतो.
आम्हाला लोक शहरातील म्हणतील, पण आम्हाला शेतकऱ्यांचे दुःख कळते. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा आपले सरकार आल्यावर पहिला निर्णय असणार आहे. याआधी आम्ही कर्ज मुक्ती केली होती त्याला जास्त प्रमाणात कागदपत्रे आणि दाखले लागले नाहीत. एका क्लिक वर कर्ज मुक्ती केली.
आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी महाराष्ट्रभर फिरलो. शेतकऱ्यावर संकट आले तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही पोहोचतो. आताही आम्ही शेतक-यांची कर्जमाफी करणार आहोत.’ अशा तऱ्हेने महाविकास आघाडीचे सरकार आले तर पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा होणार अशी मोठी घोषणा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
महत्त्वाची बाब अशी की, महायुतीने देखील आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख केला आहे. पुन्हा महायुतीचे सरकार आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे महायुतीने आपल्या दहा घोषणांच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
आता महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील शेतकरी कर्जमाफी करू असे आश्वासन दिले आहे. एकंदरीत यंदाची ही निवडणूक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच लढवली जात असल्याचे दिसते. पण जनता जनार्दन, शेतकरी राजा कोणाच्या घोषणेवर अधिक विश्वास ठेवणार? जनता कोणाच्या बाजूने कौल देणार ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.