Shetkari Karjmafi 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे यामुळे गदगद झालेल्या महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीतही तशीच कामगिरी करण्यासाठी कंबर कसली आहे.
दुसरीकडे राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीतून धडा घेत आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांना खुश करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
महिलांसाठी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, सुशिक्षित तरुणांसाठी लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांसाठी बळीराजा मोफत वीज योजना, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देणारी योजना अशा असंख्य योजना गेल्या काही दिवसांमध्ये सुरु झाल्या आहेत.
दुसरीकडे आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा देखील लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर महाराष्ट्र राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
2017 मध्ये आणि 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ दिला होता.
तसेच 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ दिला होता. मात्र या दोन्ही कर्जमाफी योजनेतून राज्यातील काही शेतकरी वगळले गेलेत.
महाराष्ट्रातील आदिवासी शेतकऱ्यांना या दोन्ही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याची बाब विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी मागणी केली.
दरम्यान झिरवाळ यांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी राज्यातील नऊ हजार ६९८ आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा असे आदेश संबंधितांना दिले आहेत.
यामुळे आता या संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो असे आशादायी चित्र तयार होत आहे. तथापि या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचा लाभ मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.