Shetkari Karjmafi 2024 : सध्या तेलंगाना राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय खूपच चर्चेत आहे. खरे तर तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जाहीरनामा सादर केला होता. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असे म्हटले गेले होते. विशेष म्हणजे सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेऊ असे या जाहीरनाम्यात ठामपणे सांगितले गेले होते.
यामुळे तेलंगाना मध्ये सत्तेत आल्यानंतर काँग्रेसच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्ता मिळाली तर 15 ऑगस्ट च्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे म्हटले होते. यानुसार काँग्रेसने सत्ता स्थापित केल्याबरोबर पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतला आहे.
तेलंगाना राज्य सरकारने येथील शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंत ची कर्जमाफी जाहीर केली आहे. या निर्णयाचा तेलंगाना राज्यातील तब्बल 40 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार असून यामुळे तेलंगाना राज्यातील बहुतांशी शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत.
12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले असेल त्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ केले जाणार आहे. तेलंगाना राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकार तिजोरीवर तब्बल 31 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान आज आपण शेतकरी कर्जमाफी संदर्भात काही इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण 2014 पासून ते 2024 पर्यंत कोण-कोणत्या राज्य सरकारने तेथील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
या राज्यांनी केलीय शेतकरी कर्जमाफी
तेलंगाना : याआधी देखील तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. 2014 मध्येही तेलंगाना सरकारने कर्जमाफी केली होती. त्यावेळी 51 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.
आंध्र प्रदेश : 2014 मध्ये आंध्र प्रदेश मध्ये ही शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. याचा लाभ 42 लाख शेतकऱ्यांना झाला होता.
महाराष्ट्र : 2017 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली होती. याचा तब्बल 67 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.
उत्तर प्रदेश : 2017 मध्ये उत्तर प्रदेश राज्य सरकारने तेथील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. याचा फायदा तेथील 39 लाख शेतकऱ्यांना झाला.
कर्नाटक : 2018 मध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. याचा 50 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळाला.
पंजाब : 2018 मध्ये पंजाब राज्य सरकारने तेथील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. याचा 8 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळाला.
मध्य प्रदेश : 2018 मध्ये मध्य प्रदेश राज्य सरकारने तेथील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली या निर्णयाचा 48 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला.
छत्तीसगड : 2018 मध्ये छत्तीसगड राज्य सरकारने तेथील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. या निर्णयाचा तेथील नऊ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला.
महाराष्ट्र : 2019 मध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा कर्जमाफी झाली होती. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली. याचा लाभ राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना झाला.
झारखंड : 2020 मध्ये झारखंड या आदिवासी बहुल राज्याने तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. त्यावेळी नऊ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला.
तेलंगाना : 2014 नंतर तब्बल दहा वर्षांनी अर्थातच 2024 मध्ये तेलंगणा राज्य सरकारने तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे. याचा 40 लाख शेतकरी कुटुंबांना फायदा होणार असा दावा केला जात आहे.