Shetkari Karjmafi 2024 : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बेजार झाले आहेत. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेती पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. दुसरीकडे जर शेतकऱ्यांनी बहु कष्टाने नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतमाल उत्पादित केला तर त्या मालालाही बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.
यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. पीक उत्पादनाचा खर्च देखील वाढत चालला आहे. वाढते इंधनाचे दर, महागाई अन मजुरीचे दर देखील वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत देशभरातील शेतकरी बांधव कर्जाच्या ओझ्याखाली दाबले गेले आहेत.
दरम्यान कर्जाच्या ओझ्याखाली असणाऱ्या तेलंगणामधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तेलंगाना सरकारने तेथील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला. तेथील कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत सीएम रेड्डी यांनी मंगळवारी 1 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा केली आहे.
तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलैच्या संध्याकाळपर्यंत कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केले जाणार आहेत.
तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की कर्जमाफीसाठी जारी केलेली रक्कम इतर खात्यांमध्ये पाठवू नये. सीएमओच्या म्हणण्यानुसार, बँकर्सनी कर्जमाफीसाठी सरकारने जारी केलेली रक्कम इतर खात्यांमध्ये जमा केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
तेलंगणा सरकारने तेथील शेतकऱ्यांची एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला गेला पाहिजे अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे. विशेष बाब अशी की राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात आशादायी चित्र तयार होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सरकार कर्जमाफी साठी आवश्यक असणारी आकडेवारी जमा करत आहे. विशेष म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना तर सकट तीन लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाऊ शकते का याबाबत सरकारकडून चाचपणी देखील सुरू करण्यात आली आहे.
तसेच कर्जमाफीसाठी केंद्राची मदत घेतली जाऊ शकते अशी माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यावेळी सत्तार यांनी पुढील एका महिन्यात कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी देखील सरकारकडे केली आहे.
यामुळे तेलंगाना सरकार नंतर आता महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट देऊ शकते अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. निश्चितचं जर शिंदे सरकारने याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला तर राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.