Satbara Varas Nond Maharashtra : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या कुटुंबाच्या सातबाऱ्यावर वारस नोंद करावी लागते.
ही वारस नोंद करण्यासाठी आत्तापर्यंत शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत. यामध्ये शेतकऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात. अनेकदा तर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक देखील होत असे. वारस नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत असत.
दरम्यान ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाचवण्यासाठी वारस नोंद प्रक्रिया आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया एक ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन झाली असून आता सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता भासणार नसल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या अंतर्गत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठीच्या माध्यमातून कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर वारस नोंद लागणार आहे. भुमिअभिलेख विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे तलाठ्यांवर असलेला कामाचा बोजा बऱ्यापैकी हलका होणार आहे, शिवाय यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत करावा लागणार अर्ज
जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला तीन महिन्याच्या आत वारस नोंदी साठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज आत्तापर्यंत तलाठ्याच्या माध्यमातून केला जात असे मात्र आता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वारस नोंद अर्ज ऑनलाईन सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ई हक्क हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
कशी आहे ही प्रक्रिया
वारस नोंद प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली आहे. आता वारस नोंद करण्यासाठी ई हक्क या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित व्यक्तीला मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतो. अर्जात जर काही त्रुटी असेल तर ती त्रुटी दूर केल्यानंतर पुन्हा एसएमएस येतो. तलाठ्याकडून सादर झालेल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर वारस नोंद केली जाते म्हणजेच फेरफार वर नोंद घेतली जाते.
तलाठी नसला तरी देखील अर्ज करता येणार
आतापर्यंत केवळ तलाठ्याकडे जाऊन वारस नोंद होत असे. अशा परिस्थितीत जर तलाठी कार्यालयात हजर नसेल तर शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयातून माघारी फिरावे लागत असे. मात्र आता तलाठी उपस्थित नसला तरी देखील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करून वारस नोंद करता येणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा मोठा वेळ आणि पैसा वाचणार आहे.