Satara, Sangali, Kolhapur To Mumbai : सातारा सांगली कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अति महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता सातारा सांगली आणि कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र मुंबईकडे प्रवास करताना या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो.
पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला मुंबईकडे प्रवास करताना पुणे आणि पनवेल या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे प्रवासादरम्यान अधिकचा कालावधी लागतो, परिणामी प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जातो. अशा परिस्थितीत या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी फलटण-सुरुर-वाई-महाडमार्गे जेएनपीटी-मुंबई असा भक्ती-शक्ती ग्रीनफिल्ड मार्गाचा प्रस्ताव समोर आला आहे.
या मार्गाचा प्रस्ताव आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या दोघांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवली आहे. निश्चितच केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली असल्याने हा ग्रीन फील्ड महामार्ग भविष्यात पश्चिम महाराष्ट्रातील जनतेसाठी फायद्याचा ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रस्तावित महामार्गामुळे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईकडील प्रवास सोयीचा होणार आहे. तसेच राजधानी मुंबईवरुन पंढरपूर या धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी या ग्रीन फिल्डचा वापर होऊ शकतो. यामुळे या महामार्गाला धार्मिक महत्त्व देखील प्राप्त होणार आहे. यामुळे याला भक्ती शक्ती महामार्ग असं संबोधलं जात आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, ठोसेघर तसेच रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ही पर्यटनस्थळे या प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. तसेच महाडवरून दापोली, कर्दे, मुरूड बीच याठिकाणी जाण्यासाठीही पर्यटकांना हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. थेट जेएनपीटीला हा मार्ग जोडला जाणार असल्याने याचा फायदा पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला आता ‘या’ ठिकाणी मिळणार थांबा; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
कसा असेल या महामार्गाचा रूट मॅप
हा प्रस्तावित महामार्ग फलटण-वाठार स्टेशन-सुरूर-वाई-धोम धरणमार्गे-ढवळे-महाडपर्यंत सुमारे 100 कि.मी. आणि त्यापुढे महाड ते जेएनपीटी सुमारे 120 किमीचा राहणार आहे. विशेष बाब म्हणजे हा महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहे.
हा मार्ग एकूण आठ रस्त्यांना जोडेल, यामध्ये आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग, बारामती-संकेश्वर, पुणे-बंगळूरला पर्यायी मार्ग, नवीन रेवास-रेड्डी कोस्टल मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-विरार, मुंबई-चिर्ले ट्रान्स हर्बर लिंक, महाड-पेण मार्गांचा समावेश राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त बदलला, आता ‘या’ महिन्यात होणार उद्घाटन, पहा…..