Sangli Farmer Yellow Dragon Fruit Farming : अलीकडे राज्यातील शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय फायदेशीर करून दाखवला आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे.
अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. शिवाय अनेकदा उत्पादित केलेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही. यामुळे नैसर्गिक आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा भरडला जात आहे.
यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट येण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. यामुळ, साहजिकच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील सांगली मधील एका प्रयोगशील शेतकऱ्याने यशाचा मार्ग गवसला आहे. सांगली येथील एका पर्यवेकशील शेतकऱ्याने चक्क पिवळ्या ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड करून दाखवली आहे. आतापर्यंत तुम्ही व्हिएतनांमध्ये प्रामुख्याने आढळणारे हे विदेशी ड्रॅगन फ्रुट लाल रंगांमध्ये पाहिले असेल.
परंतु सांगली येथील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क पिवळ्या कलरची ड्रॅगन फ्रुट उत्पादित करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. जिल्ह्यातील जत तालुक्यातील मौजे उटगी येथील शेतकरी उमेश लिगाडे यांनी ही किमया साधली आहे. लिगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सर्वप्रथम 2014 मध्ये ड्रॅगन फ्रुट ची शेती सुरू केली होती.
सुरुवातीला त्यांनी लाल ड्रॅगन फ्रुटची लागवड केली होती. यानंतर 2021 मध्ये त्यांनी पिवळ्या ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली. या पिवळ्या ड्रॅगन फ्रुटला इस्रायली ड्रॅगन फ्रुट म्हणून देखील ओळखले जाते. इस्रायल मध्ये या ड्रॅगन फ्रुटच्या जातीची सर्वाधिक शेती होते. उमेश यांनी 2,000 पिवळ्या ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड केली आहे.
आता या पिवळ्या ड्रॅगन फ्रुट पिकातून त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. या पिवळ्या ड्रॅगन फ्रुटची विशेषता म्हणजे लाल ड्रॅगन फ्रुट पेक्षा याची टिकवण क्षमता अधिक असते. हे फळ चवीला काहीसे आंबट, खारट आणि गोड असते. मिक्स चवीमुळे याला बाजारात मोठी मागणी असते.
दरम्यान उमेश यांनी उत्पादित केलेले पिवळे ड्रॅगन फ्रुट पुण्यातील गुलटेकडी येथील शिवाजी मार्केट यार्ड विक्रीसाठी नेले होते. उमेश यांनी 248 किलो पिवळे ड्रॅगन विक्रीसाठी नेले होते त्यास 38 हजार रुपये एवढा दर मिळाला आहे. अर्थातच किलोला 153 रुपयाचा भाव मिळाला आहे. निश्चितच उमेश यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.