Rain Alert : या चालू वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट होते. चालू महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले.
आता मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे दूर झाले आहे. आता राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील थंडीची तीव्रता वाढत चालली आहे.
मध्य भारतात देखील थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. अशातच मात्र देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माध्यमातून देशातील हवामानाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे आज देशातील काही भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
तसेच काही ठिकाणी आज बर्फवृष्टी होईल असा अंदाज आहे. एवढेच नाही तर देशातील काही भागात हलका ते मध्यम पावसाचा आणि काही भागात गारपीट होईल असा अंदाज देण्यात आला आहे.
IMD ने म्हटल्याप्रमाणे देशातील जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये आज अर्थातच 18 जानेवारी 2024 ला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या संबंधित भागांना देखील थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय, आज गुरुवारी बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि पूर्वोत्तर भारतात काही भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे ईशान्येकडील काही राज्यांमध्ये गारपीट होणार अशी शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्किममध्ये काही भागात गारपिट होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, तामिळनाडूच्या दक्षिण भागांमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये रिमझिम पावसाची म्हणजेच अगदी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होईल असा अंदाज आहे. परिणामी तेथील शेतकऱ्यांना शेतीपिकांची आणि चाऱ्याची काळजी घ्यावी लागणार आहे.