Rain Alert : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधील वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, वादळ अशा असंख्य संकटांमुळे विविध राज्यांमधील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे.
हवामान बदलाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अशातच, आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आजपासून पुढील तीन ते चार दिवस देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.
यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आगामी काही दिवस अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात या कालावधीत कसे हवामान राहणार, महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, याच संदर्भात आयएमडीने एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
काय आहे हवामान खात्याचा अंदाज
यंदा ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने तांडव केला होता. हिवाळ्यात आपल्या राज्यात देखील अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. नोव्हेंबर महिन्यापासून अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले असून प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस हा हजेरी लावत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा त्राहिमा पाहायला मिळाला.
यानंतर नवीन वर्षाची सुरुवात ही अवकाळी पावसाने झाली. जानेवारी, फेब्रुवारी तसेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला देखील महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आता गेल्या आठवड्याभरापासून मात्र महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे.
राज्यात दुपारी कडक ऊन आणि सकाळी थंड गारवा असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. राज्यातील बहुतांशी भागातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. अशातच मात्र देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये आगामी तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, 11 ते 13 मार्च या कालावधीत उत्तराखंडमध्ये हलका पाऊस अन बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.तसेच 12 आणि 13 मार्च 2024 रोजी पंजाब, 13 मार्च रोजी हरियाणा, दिल्ली अन पश्चिमी उत्तर प्रदेशात अवकाळी पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे.
याशिवाय आगामी चार दिवस देशातील जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बलुचिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश या राज्यांत सुद्धा अवकाळी पावसाचे सत्र पाहायला मिळणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आपल्या महाराष्ट्रातील हवामानाबाबत बोलायचं झालं तर राज्यात आगामी काही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
राज्यात आगामी काही दिवस अवकाळी पाऊस किंवा गारपीटीची शक्यता नाहीये. उत्तर भारतात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे मात्र आपल्या राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.