Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह संपूर्ण देशभरातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यात या चालू महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेचं झाली आहे.
पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातून अवकाळी पाऊस गायब झाला आहे. आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागला आहे. खरे तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते. यंदा मात्र नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
याचा परिणाम म्हणून यंदा नोव्हेंबर महिन्यात गारठा जाणवला नाही. डिसेंबर मध्ये मात्र थंडी वाढण्याची शक्यता होती पण आता डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा उलटला आहे तरीही राज्यात अजूनही कडाक्याची थंडी पडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या राज्यातील काही भागांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे तर काही ठिकाणी अजूनही ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
यामुळे थंडीचे प्रमाण आणखी कमी होईल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागांमध्ये २१ डिसेंबर नंतर किमान तापमान वाढेल आणि यामुळे थंडीचा जोर थोडासा कमी होईल असे हवामान खात्याच्या माध्यमातून सांगितले जात आहे.
तर दुसरीकडे देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. खरंतर सध्या स्थितीला तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे.
यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचले असल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.
अशातच आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती कायम असल्याने पुढील दोन दिवस देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन दिवस दक्षिणी तमिळनाडू, केरळ राज्यातील दक्षिणेकडील भाग आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार असे सांगितले जात आहे. तर उर्वरित तामिळनाडू आणि किनारी कर्नाटक भागात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज देण्यात आला आहे.
याशिवाय, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिण किनारपट्टी भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या संबंधित भागातील नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे.