Rain Alert : बंगालच्या उपसागरात या हंगामातील दुसरे चक्रीवादळ तयार झाले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात हामून नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. या चक्रीवादळामुळे देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला होता. आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळाची निर्मिती झाली.
या चक्रीवादळाला मिधिली असे नाव देण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने या चक्रीवादळाबाबत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे.या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील कोणत्या राज्यांमध्ये आणि कोणत्या भागात वादळी पाऊस कोसळू शकतो याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे, हे बंगालच्या खाडीत तयार झालेले या चालू हंगामातील दुसरे चक्रीवादळ मिधिला आता बांगलादेशमध्ये आहे.
तसेच हे वादळ त्रिपुरा आणि लगतच्या भागात खोल उदासीनता म्हणून सक्रिय असल्याचे निरीक्षण हवामान विभागाने नोंदवले आहे. याचा परिणाम म्हणून भारतात विभागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे.
IMD ने 22 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण भारत, पूर्व भारत आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
केरळ आणि तामिळनाडू मध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 21 नोव्हेंबरला किनारी आंध्र प्रदेशात आणि 22 नोव्हेंबरला तामिळनाडूमध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार अंदाज आहे. शिवाय देशातील काही भागांमध्ये धुक्याची दाट चादर पाहायला मिळणार आहे.
उर्वरित भारतात मात्र या चक्रीवादळाचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाही. या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावरही विपरीत परिणाम होणार नाहीये.पण आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे. मात्र आज महाराष्ट्रातील कोणत्याचं जिल्ह्यात पाऊस पडणार नाही.
शिवाय पुढील चार दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज आयएमडीने नुकताच वर्तवला आहे. एकंदरीत या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील काही भागात जोरदार वारे वाहतील आणि वादळी पाऊस पडेल असे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी अधिक सावध राहणे अपेक्षित आहे.