Rain Alert : गेल्या अनेक दिवसांच्या खंडानंतर पुन्हा एकदा वरून राजाची महाराष्ट्रावर कृपादृष्टी झाली आहे. वरून राजा गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रावर मोठा प्रसन्न असून राज्यातील विविध भागात आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वास्तविक या चालू महिन्यात राज्यात गणेशोत्सवापासून पावसाला सुरुवात झाली.
मात्र पावसाचा खरा जोर वाढला तो 22 सप्टेंबर पासून अर्थातच शुक्रवारपासून. शुक्रवारपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात चांगला समाधानकारक पाऊस होत आहे. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे दानाफान उडाली आहे. नागपूर मध्ये तर ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे.
नागपूर प्रमाणेच राज्यातील अहमदनगर, नासिक, जळगाव, बीड, पुणे अशा विविध भागांमध्ये अति मुसळधार पाऊस होत आहे. अशातच हवामान खात्याने 28 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच हवामान खात्याने आजपासून देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
आज पश्चिम महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. अर्थातच आता राजस्थानमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच आज राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
आज राज्यातील कोकण, खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या आपल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार, आज 25 सप्टेंबर रोजी राज्यातील ठाणे, रायगड, जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वासिम, यवतमाळ या 22 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित भागातील नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. निश्चितच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.