Rain Alert : राज्यासह संपूर्ण देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल होऊ लागला आहे. राज्यातील हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे.
अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 10 ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्थातच आगामी पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
या कालावधीत राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशमधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता.
यानंतर या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परिणामी वाढीच्या अवस्थेत असलेल्या गहू, हरभरा तसेच कांदा व इतर फळबाग पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट येणार अशी भीती व्यक्त होत आहे.
कुठे बरसणार अवकाळी पाऊस?
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या अर्थातच 11 फेब्रुवारी पर्यंत खानदेशमधील नंदुरबार, धुळे, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
याशिवाय मराठवाड्यात देखील आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात उद्यापर्यंत पाऊस बरसत राहणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे.
विदर्भात मात्र 14 फेब्रुवारी पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात 14 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार असे आयएमडीने म्हटले आहे.
दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्रात किंचित ठिकाणी ढगाळ हवामान राहू शकते मात्र अवकाळी पाऊस होणार नाही असा अंदाज तज्ञांनी दिला आहे.
यामुळे ज्या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी तज्ञांनी केले आहे.