Railway Ticket : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. खरंतर आपल्या देशात प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते. याचे कारण म्हणजे हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणार आहे. हा प्रवास खिशाला तर परवडणारा आहेच शिवाय देशाच्या कानाकोपऱ्यात याचे नेटवर्क पसरलेले आहे.
यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास सर्वप्रथम रेल्वेलाच प्राधान्य दिले जात आहे. मात्र या प्रवासात प्रवाशांना काही अडचणींचा देखील सामना करावा लागतोय. या प्रवासात अनेकांना कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येत असल्याची वास्तविकता आहे.
याबाबत प्रवासी नेहमीच तक्रार करताना दिसतात. अनेकवेळा असे घडते की, खूप आधी बुकिंग करूनही तिकीट वेटिंगमध्येच राहते. तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर या अडचणीचा तुम्हालाही सामना करावा लागला असेल.
मात्र, आता ही समस्या दूर होणार आहे. सरकारने ही अडचण सोडवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. याच संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी एक महत्त्वाची माहिती देखील दिली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी काय म्हटले?
रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कन्फर्म तिकीट संदर्भात बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात की, येत्या पाच वर्षात जवळपास सर्वच प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे सुरू होईल.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. यासाठी येत्या पाच वर्षात रेल्वेची क्षमता इतकी वाढवली जाईल की ज्याला रेल्वेने प्रवास करायचा असेल त्याला कन्फर्म तिकीट सहज मिळू शकेल.
गेल्या दशकात रेल्वेच्या विकासाचा वेग लक्षणीय वाढला आहे, असेही ते म्हणाले आहेत. एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे मंत्र्यांनी 2014 ते 2024 या कालावधीत किती किलोमीटर लांबीचे रेल्वे ट्रॅक बसवले गेले आहेत याविषयी अपडेट दिली आहे.
वैष्णव म्हणाले की, 2004 ते 2014 या काळात केवळ 17,000 किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक बांधण्यात आले. त्याच वेळी, 2014 ते 2024 पर्यंत 31,000 किलोमीटरचे नवीन ट्रॅक तयार करण्यात आले. म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळात यूपीए सरकारच्या कार्यकाळापेक्षा दुप्पट क्षमतेने रेल्वे ट्रॅक तयार झाले आहेत.
तसेच, 2004 ते 2014 दरम्यान सुमारे 5,000 किमी रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आले, तर गेल्या 10 वर्षांत 44,000 किमी रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आले. 2004-2014 पर्यंत केवळ 32,000 डबे बांधले गेले. तसेच गेल्या 10 वर्षांत 54,000 डबे तयार करण्यात आले आहेत.
एकंदरीत, मोदी सरकारने रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून यामुळे आगामी काळात प्रत्येकालाच कन्फर्म तिकीट मिळू शकणार आहे. असे झाल्यास रेल्वेचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे यात शंकाच नाही.