Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. खरेतर सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांवरील रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रेल्वे स्थानकावर अक्षरशः पाय ठेवण्यासाठी देखील जागा शिल्लक राहत नाहीये.
यामुळे, प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान प्रवाशांची हीच अडचण सोडवण्यासाठी आणि अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून काही विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने देखील अतिरिक्त गर्दी लक्षात घेता एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पुरी-उधना दरम्यान द्विसाप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी चालवणार आहे.
या उन्हाळी विशेष गाडीमुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरणार अशी आशा रेल्वेला आहे.
ही गाडी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा फायदा होणार आहे.
दरम्यान आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
हाती आलेल्या माहितीनुसार, पुरी-उधना विशेष एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०८४७१) ट्रेन 25 एप्रिल ते 27 जून या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही विशेष गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सोमवारी आणि गुरुवारी सोडली जाणार आहे.
पुरी स्थानकावरून ही गाडी सकाळी साडेसहा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी १४:०० वाजता ही गाडी गुजरात राज्यातील उधना या रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच उधना-पुरी विशेष एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०८४७२) २६ एप्रिल ते २८ जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी गुजरात मधील उधना रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे. उधना स्थानकावरून सायंकाळी १७:०० वाजता ही गाडी निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २२:४५ वाजता पुरी स्थानकावर पोहोचणार अशी माहिती देण्यात आली आहे.
कुठे थांबणार ही गाडी
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेनला महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, पाळधी, अमळनेर, नंदुरबार या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार आहे.