Railway News : भारतात प्रवासासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. देशातील करोडो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने तसेच आरामदायी आणि जलद प्रवास होत असल्याने या प्रवासाला प्रवाशांकडून नेहमीच पसंती दिली जाते.
भारतीय रेल्वे सुरू होऊन आता जवळपास 170 वर्षे पूर्ण झाली आहेत. 170 वर्षांच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. देशात जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा ती कोळशावर चालत होती.
मात्र आता काळाच्या ओघात रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला आहे. आता रेल्वे डिझेल इंजिनवर तसेच लाईटवर चालत आहे. राजधानी, शताब्दी यांसारख्या रेल्वे गाड्या प्रवाशांचा प्रवास गतिमान करत आहेत.
यासोबतच वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन देखील देशात सुरू करण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी भारतात बुलेट ट्रेन देखील चालवली जाणार आहे.
देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर चालवण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून सध्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 2024 पर्यंत या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरू होणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
अशातच आता देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय रेल्वे लवकरच हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरु करणार आहे. पुढल्या वर्षी ही ट्रेन रुळावर धावू शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Indian Railway प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन आता जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन सुरु करणार आहे. या ट्रेनला 10 डबे राहणार आहेत. ही ट्रेन सर्वप्रथम हरियाणा मध्ये सुरू केली जाणार आहे.
ही गाडी हरियाणाच्या जिंद ते सोनीपत दरम्यान चालवली जाणार असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. ही ट्रेन धूर न सोडता धावेल, ज्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल. ही एक पर्यावरण पूरक गाडी राहणार आहे.
ही इको-फ्रेंडली ट्रेन सर्वप्रथम जर्मनीमध्ये सुरू करण्यात आली आहे, जिथे फक्त दोन डब्यांची Hydrogen Train चालवली जात आहे.आता ही Hydrogen Train आपल्या भारतात देखील लाँच केली जाणार आहे.
रेल्वे प्रशासन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन ट्रेनची रचना करत आहे. ही गाडी 105 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. ही गाडी दिवसाला 360 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.