Railway News : कोणत्याही विकसित देशात तेथील वाहतूक व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते. विकसित देशाची हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विकसनशील देशाच्या तुलनेत अधिक सक्षम दिसते. भारत हा देखील तेजीने विकसित होणारा देश आहे. यामुळे आपल्या देशाची वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर केंद्रातील सरकारचे विशेष लक्ष आहे. रेल्वे वाहतुकीबाबत बोलायचं झालं तर देशात वंदे भारत एक्सप्रेस सारखी संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे. तसेच बुलेट ट्रेन येत्या काही महिन्यांनी रुळावर धावताना दिसणार आहे.
बुलेट ट्रेन ही देशातील पहिली हायस्पीड ट्रेन राहणार आहे. ही गाडी तब्बल ३६० किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्या सक्षम राहणार आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर चालवली जाणार आहे. मात्र चायना मध्ये नुकतीच सहाशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
म्हणजेच या गाडीचा वेग हा विमानापेक्षा अधिक आहे. विमानापेक्षा सुपरफास्ट असणाऱ्या या ट्रेनला मॅग्लेव असे नाव देण्यात आले आहे. ही ट्रेन चायना मध्ये नुकतीच सुरू झाली असून जर ही गाडी आपल्या भारतात सुरू झाली तर मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या वीस मिनिटात कापले जाणार आहे.
मुंबई ते गोवा अंतर एका तासात आणि मुंबई ते नागपूर हे अंतर फक्त दीड तासात कापले जाणार आहे. चीनमध्ये सुरू झालेली ही मॅगलेव्ह ट्रेन जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. चीनच्या चाइना रेल्वे रोलिंग स्टॉक कोर्पोरेशननं ही ट्रेन तयार केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या ट्रेनची चाचणी सुद्धा यशस्वी झाली आहे. चीनमध्ये पेंचिंग आणि शंघाई दरम्यान ही ट्रेन चालवली गेली आहे. ही वेगवान ट्रेन जमिनीपासून थोडी उंचावरुच धावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जमिनीपासून 10 सेंटीमीटर उंचीवरून ही ट्रेन धावते.
चीनमधील किंगदाओमध्ये या ट्रेनची निर्मिती झाली आहे. इलेक्ट्रो-मॅगनिक फोर्स म्हणजेच विद्युत चुंबकीय बलाचा वापर करून ही ट्रेन धावते. मॅग्लेव ट्रेन ही रेल्वे रूळांवर न धावता हवेतच धावते. या ट्रेनचा वेग 600 किमी प्रतितास आहे.
वेगाने धावणाऱ्या या ट्रेनला बीजिंगपासून शांघाईपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 2.5 तास लागतात. या दोन्ही शहरातील अंतर एक हजार किमी एवढे आहे. म्हणजेच ही ट्रेन १००० किलोमीटरचे अंतर फक्त अडीच तासात पूर्ण करण्याची क्षमता ठेवते.
नक्कीच जर ही ट्रेन भारतात सुरू झाली तर भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकात अवघ्या काही तासात पोहोचता येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अवघ्या काही मिनिटात पोहोचता येणार आहे.
तथापि हे तंत्रज्ञान खूप महाग आहे. शिवाय भारताची भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक, आर्थिक विषमता पाहता ही ट्रेन सुरु करणे मोठे आव्हानात्मक राहणार आहे. त्यामुळे जाणकार लोकांनी अशी हायस्पीड ट्रेन भारतात सुरू होणे फारच कठीण असल्याचे मत नोंदवले आहे.