Railway News : भारताने गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था जलद गतीने आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र आता आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेच्या सेक्टरमध्ये ही मोठी कामगिरी झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर देशाची रेल्वे सेवा अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, आता वंदे भारत एक्सप्रेस नंतर लवकरच रेल्वे क्षेत्रात आणखी एक मोठा माईलस्टोन सेट केला जाणार आहे.
देशात लवकरच हायड्रोजनवर धावणारी ट्रेन सुरू होणार असल्याची बातमी समोर येत आहे. सध्या जगातील फक्त चार देशांमध्ये हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू आहे. आता भारत लवकरच या यादीत समाविष्ट होणार असून या यादीत भारताचे 5वे स्थान राहणार आहे.
असे मानले जात आहे की, हायड्रोजन ट्रेनच्या संचालनामुळे भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यात मोठी मदत होणार आहे. अलीकडेच, भारतीय रेल्वेने सध्याच्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन पेशींचे पुनरुत्थान करण्यासाठी पायलट प्रकल्प मंजूर केला आहे.
आतापर्यंत जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनमध्ये हायड्रोजनवर धावणाऱ्या रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. या यादीत आगामी काळात भारताचाही समावेश होणार असल्याने ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची बाब राहणार आहे.
या ट्रेनमुळे देशाचा नावलौकिक तर वाढणारच आहे शिवाय रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत आणखी सक्षम होणार आहे. दरम्यान, आता आपण देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावू शकते ? याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या मार्गावर धावणार ट्रेन ?
भारतातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनचा प्रोटोटाइप डिसेंबर 2024 मध्ये हरियाणाच्या जिंद-सोनीपत विभागात चालवला जाणार आहे. या विषयाशी निगडित अधिकाऱ्यांनी सांगितले की, हायड्रोजन ट्रेनसाठी निवडण्यात आलेल्या हेरिटेज मार्गांमध्ये माथेरान हिल रेल्वे, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे, कांगडा व्हॅली आणि निलगिरी माउंटन रेल्वे यांचा समावेश आहे.
चाचणी यशस्वी झाल्यानंतर, पुढील तीन वर्षांत या मार्गांवर हायड्रोजन गाड्या धावू लागतील, ज्या भारताच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे दर्शन घडवतील. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये प्रोटोटाइप ट्रेनचे काम सुरू आहे.
चाचण्यांनंतर, रेल्वे ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ उपक्रमांतर्गत ३५ हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. प्रत्येक ट्रेनसाठी 80 कोटी रुपये आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 70 कोटी रुपये गुंतवण्याची योजना आहे.