Rabi Season : गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. गव्हाची लागवड खरंतर संपूर्ण भारतभर केली जाते. आपल्या राज्यातही गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात होते. सध्या संपूर्ण देशभर खरीप हंगाम सुरू असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.
या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज आपण गव्हाच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गहू हे राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात उत्पादित होणारे पीक आहे.
खरे तर गव्हाची पेरणी ही रब्बी हंगामात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जिरायती गव्हाची पेरणी ही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात केली पाहिजे.
तसेच बागायती गव्हाची पेरणी ही नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करायला हवी. अशा परिस्थितीत गव्हाच्या प्रमुख जातींची माहिती जाणून घेणे अतिशय आवश्यक ठरणार आहे.
गव्हाच्या प्रमुख जाती आणि त्यांच्या विशेषता
श्रीराम सुपर 111 : जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाची ही एक उच्च उत्पादन देणारी जात आहे. या जातीच्या गव्हाची वाढ ही मध्यम स्वरूपात होते. खरे तर या जातीपासून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले उत्पादन मिळते मात्र या जातीचा एक ड्रॉबॅक देखील आहे. तो असा की हार्वेस्टिंग च्या वेळी या जातीच्या गव्हाच्या ओंब्या फुटतात. म्हणजेच जेव्हा या जातीचे पीक परिपक्व होईल तेव्हा लगेच या जातीची हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे.
अजित 102 : गव्हाची ही देखील एक सुधारित आणि उच्च उत्पादन देणारी जात आहे. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे या जातीचा गहू हा चपातीसाठी खूपच बेस्ट आहे. त्यामुळे बाजारात याला चांगला भाव मिळतो. या जातीच्या गव्हापासून एकरी 28 ते 29 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचा दावा देखील केला जात आहे.
अंकुर केदार : चपातीसाठी या जातीचा गहू देखील खूपच बेस्ट आहे. ही गव्हाची एक सुधारित जात असून हार्वेस्टिंग साठी उशीर झाला तरी देखील पिकावरील परिणाम होत नाही. या जातीपासूनही शेतकऱ्यांना एकरी 25 ते 26 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे.
Mahyco मुकुट : म्हायको कंपनीचा मुकुट हा देखील एक गव्हाचा लोकप्रिय वाण आहे. गव्हाची ही जात विदर्भ आणि मराठवाडा विभागासाठी शिफारशीत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात या जातीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात आहे.
मात्र या जातीचा गहू हा चपातीसाठी चांगला नसल्याचा दावा केला जातो. परंतु व्यावसायिक शेतीसाठी जर तुम्ही गव्हाची लागवड करत असाल तर उत्पादनाच्या बाबतीत हा गहू खूप सरस आहे. यामुळे याची तुम्ही निवड करू शकता.