Rabbi Onion Variety : सोयाबीन, कापूस या पिकांप्रमाणेच महाराष्ट्रात कांद्याची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याची लागवड मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाहायला मिळते. याशिवाय मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात देखील कांदा लागवड आपल्या नजरेस पडते. कांद्याची लागवड तीनही हंगामात केले जाते.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. यातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते.
उत्पादनाच्या बाबतीत हा जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. नाशिक जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ सुद्धा आहे. दरम्यान आज आम्ही रब्बी हंगामात कांदा लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रब्बी कांद्याच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
खरंतर रब्बी कांद्याची लागवड करण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान रोपवाटिका तयार केली जाते. या रोपवाटिकांमधील रोपे डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात पुनर्लागवडीसाठी तयार होतात.
म्हणजेच पुढील महिन्यात रब्बी हंगामातील कांद्याच्या रोपवाटिका तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ वाढणार आहे. यामुळे आज आपण रब्बी कांद्याच्या काही सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत.
रब्बी कांद्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
भीमा किरण : या जातीची रब्बी हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीपासून 135 दिवसात 28 ते 35 टन एवढे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जातो. या जातीच्या कांद्याची साठवणूक क्षमता ही जवळपास पाच ते सहा महिने एवढी आहे.
भीमा शक्ती : जर तुम्हीही यंदा रब्बी हंगामात कांद्याची लागवड करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी भीमा शक्ती हा वाण फायद्याचा ठरणार आहे. भीमाशक्ती हा कांद्याचा वाण 130 दिवसात परिपक्व होतो.
या जातीपासून सरासरी हेक्टरी 30 टन पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. तुम्ही हा कांदा पाच ते सहा महिने चाळीत साठवून ठेवू शकता. आधुनिक चाळ उभारलेली असेल तर कांदा अधिक काळ टिकतो.
पंचगंगा सीड्सचे पूना फुरसुंगी : कांद्याची ही देखील एक सुधारित जात आहे. याची लागवडही रब्बी हंगामात केली जाते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा वाण फक्त 120 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होऊ शकतो. या जातीच्या कांद्याचा रंग हा चमकदार लाल असतो.
याची टिकवण क्षमता देखील चांगली आहे. उत्पादनाच्या बाबतीतही कांद्याचा हा वाण चांगला आढळून आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये याची लागवड पाहायला मिळते. तुम्हीही यंदा रब्बी कांदा लावू इच्छित असाल तर हा वाण तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.