Rabbi Jowar Farming : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील बहुतांशी भागात खरिपातील पिकांची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली असून आता रब्बी हंगामाला सुरुवातही झाली आहे. रब्बी हंगामात राज्यात विविध पिकांची लागवड केली जाते. गहू हरभरा ज्वारी अशा विविध पिकांची शेतकरी बांधव लागवड करतात.
दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण ज्वारीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण हुरड्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ज्वारीच्या दोन जातींची माहिती पाहणार आहोत. तसेच इतर काही स्थानिक जातींची नावे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हुरड्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ज्वारीच्या दोन सुधारित जाती खालील प्रमाणे
फुले मधुर : राज्यातील काही भागांमधील शेतकरी हूरड्यासाठी ज्वारीची लागवड करतात. यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांनी हुरड्यासाठी उपयुक्त जाती विकसित केलेल्या आहेत. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाने फुले मधुर ही अशीच एक जात विकसित केली आहे.
हुरडा उत्पादन घ्यायचे असेल तर ज्वारीच्या या जातीची लागवड केली जाऊ शकते. ही जात पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे. हुरडा ज्वारी उत्पादन मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मराठवाडा पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात देखील हुरडा ज्वारी उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे. याच अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले मधुर हा वाण विकसित केला आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हुरड्यासाठी उपयुक्त हा वाण अवर्षणप्रवण स्थितीत लागवड करण्यासाठी योग्य आहे.
ज्वारी पिकावर येणाऱ्या खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास ज्वारीचा हा वाण प्रतिकारक्षम असल्याचे आढळून आले आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी ३० ते ३२ क्विंटल हुरडा आणि १२० ते १२५ क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते असाही दावा करू कृषी तज्ञांनी केला आहे.
परभणी वसंत : जर तुम्हाला ज्वारीच हुरडा उत्पादन घ्यायचे असेल तर तुम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाने विकसित केलेला हा वाण पेरू शकता. परभणी वसंत ही जात मराठवाडा विभागासाठी शिफारशीत आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ज्वारीची ही सुधारित जात खडखड्या रोगास मध्यम प्रतिकारक्षम असल्याचे आढळून आले असल्याचा दावा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे.
या जातीच्या उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर परभणी वसंत जातीची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३२-३५ क्विंटल हुरडा आणि १३०-१३२ किंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन सहजतेने मिळवता येऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
त्यामुळे जर तुम्हालाही यंदाच्या हंगामात हुरडा ज्वारी उत्पादनासाठी ज्वारीची लागवड करायची असेल तर परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली या जातीची पेरणी तुम्ही करू शकता.
ज्वारीच्या इतर जाती
जर तुम्हाला स्पेशल हुरड्याच्या उत्पादनासाठी ज्वारीची लागवड करायची असेल तर तुम्ही वर सांगितलेल्या दोन जातींची पेरणी करू शकता. किंवा सुरती, गुळभेंडी, कुची, काळी दगडी या स्थानिक वाणाची निवड करू शकता.
ज्वारीच्या या देखील जाती हुरड्याच्या उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय, प्रसिद्ध आहेत. शेतकऱ्यांना या स्थानिक जातीपासूनही हुरड्याचे चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवता येत आहे. यामुळे तुम्हीही या जातींची निवड करून चांगले उत्पादन मिळू शकतात.