Rabbi Harbhara Lagwad : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, रब्बी हंगामाच्या ऐन तोंडावर आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्या शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे.
कारण की आज आपण हरभऱ्याच्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. हरभरा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू आणि हरभरा या दोन पिकांची महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.
या दोन्ही पिकांमधून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. मात्र जर तुम्हाला हरभरा पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.
या पिकासाठी मध्यम ते भारी, काळी कसदार जमीन अतिशय उपयुक्त असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. हरभऱ्याची लागवड ही 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात केली जाऊ शकते. या काळात हरभरा लागवड केली तर नक्कीच चांगले विक्रमी उत्पादन मिळते.
काही कारणास्तव या काळात पेरणी केली गेली नाही तर उत्पादनात घट येण्याची भीती असते. जर एखाद्याने डिसेंबर महिन्यात हरभऱ्याची लागवड केली तर उत्पादन खूपच कमी होते. यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात हरभरा पेरणी करण्याचा प्रयत्न करावा. दरम्यान आता आपण हरभऱ्याच्या सुधारित जाती जाणून घेऊया.
हरभऱ्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
जर तुम्ही यंदा हरभरा लागवड करू इच्छित असाल तर तुम्ही विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विक्रांत या जातींची निवड करू शकता. हरभऱ्याच्या या जाती वाढ, मर रोग प्रतिकारक्षम आहेत.
महत्त्वाची बाब अशी की या जाती जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. काबुली हरभऱ्याची लागवड करायची असेल तर तुम्ही विराट, पिकेव्ही -२, पिकेव्ही – ४ आणि कृपा हे वाण निवडू शकता. या जाती उच्च उत्पादनासाठी ओळखल्या जात आहेत.
हरभऱ्याच्या आम्ही सांगितलेल्या या जातींपैकी विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहू भागासाठी सर्वोत्कृष्ट आहेत. फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे. विशाल हा एक टपोऱ्या दाण्याचा वाण आहे.
विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील आहे, हा वाण मर रोगाला प्रतिकारक्षम असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. याशिवाय फुले विक्रम हा नविन वाण यांत्रिक पद्धतीने काढण्याकरिता प्रसारित करण्यात आला आहे.