Pune Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची हजेरी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी मधील गहू, हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फटका बसला आहे.
यामुळे सदर शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई लवकरात लवकर मंजूर झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मंजूर व्हावी अशी मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
अशातच, आता पुणे वेधशाळेने एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. यात पुणे वेधशाळेने आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? कोणत्या भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि कोणत्या भागात अवकाळी पावसाचे सावट राहील याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
काय म्हणतंय पुणे वेधशाळा ?
महाराष्ट्रातील काही भागात सध्या स्थितीला तापमानाचा पारा 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे. म्हणजेच राज्यात सध्या संमिश्र वातावरणाची अनुभूती या ठिकाणी होत आहे. विदर्भ विभागात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट आहे.
विशेष म्हणजे पुणे वेधशाळेने आज सुद्धा विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ विभागातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मात्र, विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित भागात तापमानात वाढ होईल आणि हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे पुणे हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे. हवामान खात्याकडून समोर आलेल्या माहितीनुसार, एक कमी दाबाची रेषा ईशान्य उत्तर प्रदेशपासून पूर्व विदर्भापासून जात आहे. तसेच एक पश्चिमी विक्षोभ भारताच्या पश्चिमेवर स्थित आहे.
याचाच परिणाम सध्या आपल्या महाराष्ट्रावर पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील विदर्भात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. आगामी पाच दिवस राज्यातील कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
या सदर विभागातील कमाल आणि किमान तापमान देखील आगामी काळात वाढेल असा अंदाज आहे. यातील उत्तर महाराष्ट्रात तर दिवसाचे कमाल तापमान काही ठिकाणी 38 अंश सेल्सिअस पर्यंत आत्ताच पोहोचले आहे.
त्यामुळे आगामी काळात उन्हाची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, राज्यातील विदर्भ विभागात अजूनही अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता कायमच आहे. मात्र, त्यानंतर पुढील चार दिवस राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे होईल असा अंदाज आहे.