Pune Weather Department : यावर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाने एक मोठी भविष्यवाणी केली होती. कदाचित तुम्हीही याबाबत वाचले असेल. अमेरिकेच्या हवामान विभागाने आपल्या दीर्घकालीन हवामान अंदाजात असा अंदाज व्यक्त केला होता की, यंदा भारतासहित आशिया खंडात कमी पाऊस पडू शकतो, भारतात दुष्काळही पडू शकतो अस नमूद करण्यात आले होते.
त्यानंतर भारतातीलही अनेक हवामान तज्ञांनी आणि हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थांनी अमेरिकेच्या हवामान विभागाच्या या अंदाजाला दुजोरा देण्याचे काम केले होते. स्कायमेट या भारतातील हवामान अंदाज वर्तवणाऱ्या मोठ्या संस्थेने देखील भारतात यंदा कमी पाऊस पडणार, एलनिनोमुळे यंदा मान्सून प्रभावित होणार असा अंदाज व्यक्त केला होता.
विशेष बाब अशी की भारतीय हवामान विभागाने देखील यंदा एलनिनोचा प्रभाव राहणार असे मान्य केले होते मात्र यंदा सरासरी एवढा तरी पाऊस पडेल असे हवामान विभागाने अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. दरम्यान एलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात पुरेसा पाऊस झालेला नाही.
जून महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. जुलै महिन्यात मात्र राज्यात चांगला पाऊस बरसला होता. परंतु जून महिन्यातील आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढण्यासाठी तेवढाच पाऊस पुरेसा नाहीये. जुलै महिन्याच्या अखेरपासून ते आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील काही भाग वगळता कुठेच पाऊस पडलेला नाही.
या एका महिन्याच्या काळात राज्यात कुठेच मुसळधार पाऊस पडलेला नाही. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस मात्र पडला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील कोकणात रिमझिम पाऊस पडत आहे. सध्या केवळ श्रावण सऱ्या बरसत आहेत. शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची गरज आहे. यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे आहेत.
विशेष बाब अशी की, जर आता मोठा पाऊस पडला नाही तर यंदा शेतकऱ्यांची शेती पिके तर वाया जातीलच शिवाय सामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. कारण की, राज्यातील बहुतांशी धरणे अजूनही फुल भरलेली नाहीत. अशातच पुणे वेधशाळेने पावसासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे.
पुणे वेधशाळेने आगामी पाच दिवस महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुणेसह संपूर्ण राज्यात आगामी पाच दिवसांसाठी वेधशाळेने कोणताच अलर्ट जारी केलेला नाही. सध्या राज्यात मोसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत नाहीये.
यामुळे आगामी पाच दिवस राजधानी मुंबई, पुणेसह राज्यभर पावसाची उघडीप राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Pune Weather Department ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोसमी पावसाचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे निघून गेले आहे.
यामुळे राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, आगामी पाच दिवस राज्यात पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे. परंतु सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस पडू शकतो असे पुणे वेधशाळेने नमूद केले आहे. यामुळे आता सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस पडणार का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.