Pune Vande Bharat Sleeper Train : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुण्याला वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार आहे. यासाठी आता पुण्यातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू झाला आहे.
खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे.
ही गाडी 2019 मध्ये रुळावर पहिल्यांदा धावली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत.
परंतु सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेस फक्त चेअर कार प्रकारात धावत आहे. मात्र आता याचे स्लीपर वर्जन देखील रुळावर येणार आहे. रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे.
ही स्लीपर ट्रेन मुंबई ते बरेली आणि मुंबई ते सिकंदराबाद यांसारख्या व्यस्त मार्गांवर चालवली जाणार असा दावा देखील मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आहे.
या भेटीत मोहोळ यांनी रेल्वेच्या पुणे विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली आहे. पुणे विभागातील रेल्वेचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही भेट घेण्यात आली होती आणि या भेटीत रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊ असे आश्वासन दिले आहे.
रेल्वेमंत्र्यांनी पुणे विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मकता दाखवली असल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न आता सुटतील अशी आशा आता व्यक्त केली जात आहे. या भेटीदरम्यान मोहोळ यांनी पुणे ते दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे.
तसेच, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे-अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे.
मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे, पुण्याहून नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर या दरम्यान वंदे भारत मेट्रो सुरु करण्याबाबत विचार व्हावा, या संदर्भातही त्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे.