Pune Vande Bharat Railway News : पुणेकरांना आगामी काळात आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरे तर 2019 मध्ये देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. पहिली गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
आतापर्यंत देशातील जवळपास 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर अन पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
आतापर्यंत पुणेकरांना पुणे ते हुबळी, पुणे ते कोल्हापूर अन सी एस एम टी – पुणे – सोलापूर या तीन गाड्यांची भेट मिळालेली आहे. मात्र आता लवकरच आणखी चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस पुण्याला मिळणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. दरम्यान आज आपण पुण्याला कोणत्या नवीन चार वंदे भारत एक्सप्रेस मिळणार? याचा आढावा घेणार आहोत.
या चार मार्गांवर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते हुबळी, पुणे ते कोल्हापूर अन सीएसएमटी – पुणे – सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या मार्गांवर देखील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावताना दिसणार आहे.
असे झाल्यास पुण्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 7 वर पोहोचणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी गतिमान होईल अशी आशा आहे. तथापि या वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेतला जाणार आहे.
पण, तूर्तास रेल्वे बोर्डाने या अशा गाड्या चालवण्याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. यामुळे रेल्वे बोर्ड खरंच या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
दुसरीकडे, नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु करावी अशी मागणी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खासदार शोभा बच्छाव यांनी ही मागणी केली आहे.
या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सुद्धा म्हटले आहे. नव्या वर्षात म्हणजेच 2025 मध्ये या मागणीवर सकारात्मक निर्णय होऊ शकतो असे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेले आहेत. असे झाल्यास पुणे ते धुळे या मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसणार आहे. यामुळे पुण्यातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे.