Pune Vande Bharat Express : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणेकरांना लवकरच आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या पुणेकरांना मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा लाभ मिळत आहे.
मात्र आता थेट पुणे शहरातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. खरंतर सध्या भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालवली जात आहे. यापैकी पाच मार्ग महाराष्ट्रातून जातात.
राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते गोवा, मुंबई ते साईनगर शिर्डी, नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर दरम्यान ही गाडी चालवली जात आहे. अशातच पुढल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणूका आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असल्याने आता महाराष्ट्रातील जनतेला खुश करण्यासाठी राज्यातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते सिकंदराबाद आणि नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. विशेष बाब अशी की पुणे ते सिकंदराबाद दरम्यानच्या या नवीन गाडीसाठी ट्रायल रन देखील पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे आता लवकरच या मार्गावर ही गाडी सुरू होणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
कोणत्या मार्गे धावणार?
मीडिया रिपोर्टनुसार, आगामी काही महिन्यात संपूर्ण देशभरात 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. एका मीडिया रिपोर्टमध्ये 2024 पर्यंत देशातील एकूण 75 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होईल असा दावा करण्यात आला आहे. याचाच अर्थ 2024 च्या अखेरपर्यंत आणखी 50 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे.
यात पुणे ते सिकंदराबाद आणि नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान चालवल्या जाणाऱ्या गाडीचा देखील समावेश राहणार आहे. तसेच ही पुणे ते सिकंदराबाद दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ या गाडीमुळे सोलापूरवासियांना दुसरी वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
जनशताब्दी एक्सप्रेस बंद होणार
सध्या पुणे ते सिकंदराबाद दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेस चालवली जात आहे. या गाडीने या दोन शहरादरम्यानचा प्रवास जवळपास साडेआठ तासात पूर्ण होतोय. पण आता या मार्गावरील जनशताब्दी एक्सप्रेस बंद करून वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. त्यामुळे हा साडेआठ तासाचा प्रवास आणखी कमी वेळेत पूर्ण होणार आहे.
याशिवाय नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान सध्या सुरू असलेल्या एक्सप्रेस गाडीने प्रवास करण्यासाठी सात तासांचा कालावधी लागत आहे. मात्र या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर या वेळेत आणखी बचत होणार आहे.
तसेच नागपूर ते सिकंदराबाद दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसला काजीपेट, रामागुंडम, मनचेरियल, सिरपूर कागजनगर आणि बलारशाह या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार अशी माहिती हाती आली आहे.