Pune Vande Bharat Express : पुण्या मार्गे धावणाऱ्या मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस नंतर पुण्याला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार होती. पुणे ते हुबळी दरम्यान 16 सप्टेंबर पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार होती. सध्या महाराष्ट्रातून एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्या मार्गे चालवली जात आहे. मात्र अजूनही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे रेल्वे स्टेशनवरून एकही वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात नाही.
पण, पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी बातमी समोर आली होती. ही गाडी 16 सप्टेंबर पासून रुळावर येणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. ही ‘वंदे भारत’ ट्रेन आठवड्यातून तीन दिवस हुबळी- मिरज- कोल्हापूर- मिरज- पुणे आणि पुणे-मिरज-कोल्हापूर-मिरज-हुबळी अशी धावणार होती.
मात्र आता या गाडीचा उद्घाटन सोहळा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे पुणे रेल्वे स्टेशन वरून थेट वंदे भारत ट्रेन सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
पुणे विभागातील रेल्वेचे जनसंपर्क राम पॉल बारपाग्गा यांनी या वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. आता ही ट्रायल रन 16 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता घेतली जाणार आहे. यामुळे ट्रायल रन घेतल्यानंतर ही गाडी नेमकी कधी सुरू होते? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
परंतु ट्रायल रन पुढे ढकलण्यात आली असल्याने ही गाडी प्रत्यक्षात 16 सप्टेंबरला रुळावर येणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या गाडीच्या उद्घाटनासाठी कधी मुहूर्त लागतो हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.
कसं असणार वेळापत्रक?
हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सोमवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस चालवले जाणार आहे. ही ट्रेन हुबळी येथून पहाटे 5:00 वाजता निघणार आहे अन दुपारी 1:30 वाजता पुण्यात पोहचणार आहे. तसेच, पुण्याहून दुपारी 2:30 वाजता ही गाडी सोडली जाणार आहे आणि रात्री दहा वाजता हुबळीला पोहोचणार आहे.
या दोन्ही शहरादरम्यान 558 किलोमीटरचे अंतर आहे. यामुळे हा 558 किलोमीटर लांबीचा प्रवास पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ने जलद होईल अशी आशा आहे. पण आता या गाडीचे उद्घाटन प्रत्यक्षात लांबले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांचा हिरमोड झाला आहे.