Pune Successful Farmer : अलीकडे शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी राजा भरडला जात आहे. शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी, अतिवृष्टी दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटांचा सामना करून जर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले तर उत्पादित झालेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही ही शोकांतिका आहे.
सध्या कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांच्या बाबतीत अशीच अडचण पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत आले आहेत. मात्र या विपरीत परिस्थितींमधूनही राज्यातील शेतकऱ्यांनी मार्ग शोधला आहे.
शेतीमध्ये नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर येथील एका युवा शेतकऱ्याने अवघ्या दहा गुंठ्यात सहा लाखांची कमाई केली आहे. या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीच्या पिकातून सहा लाख रुपये कमवून इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे.
यामुळे सध्या या युवा शेतकऱ्याची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. भोर तालुक्यातील धामणदेववाडी हिर्डोशी येथील युवा शेतकरी सुरेश कोंडीबा गोरे यांनी डोंगर उतारावर असलेल्या माळरान जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
त्यांनी दहा गुंठे जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड केली. या पिकाला त्यांनी कोणत्याच रासायनिक औषधांची फवारणी केलेली नाही. पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी स्ट्रॉबेरीची बाग फुलवली आहे.
कोणत्या जातीची लागवड केली
सुरेश यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे मागवली. आर वन व नाबिला या जातींची त्यांनी लागवड केली. स्ट्रॉबेरीची सात हजार रोपे त्यांनी लावली आहेत. त्यांनी पंधरा रुपये प्रति रोप याप्रमाणे रोपांची खरेदी केली आहे.
स्ट्रॉबेरी लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची चांगल्या पद्धतीने पूर्वमशागत करून घेतली होती. नागरणी, कुळवणी करून त्यांनी स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी वावर तयार करून घेतले. यानंतर दोन रोपांमध्ये 45 सेंटिमीटर आणि दोन ओळींमध्ये 60 सेंटीमीटर एवढे अंतर ठेवून त्यांनी लागवड पूर्ण केली.
या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी त्यांनी शेणखत, जीवामृत आणि लेंडी खताचा वापर केला. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. आता त्यांना यातून तीन टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळणार आहे.
किती कमाई होणार
या पिकासाठी त्यांनी आत्तापर्यंत अडीच लाख रुपयांचा खर्च केला आहे. विशेष म्हणजे तीन टन एवढे उत्पादन मिळाले असून स्ट्रॉबेरीला प्रति किलो दोनशे रुपये एवढा भाव मिळत आहे. थेट व्यापाऱ्याला माल विक्री करण्याऐवजी थेट ग्राहकाला स्ट्रॉबेरी उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी त्यांच्या आईने स्टॉल लावला आहे. दुसरीकडे सुरेश थेट पुण्याला जाऊन ग्राहकांना स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत. यामुळे त्यांना या पिकातून जवळपास सहा लाख रुपयांची कमाई होणार आहे. खर्च वजा जाता जवळपास साडेतीन ते चार लाख रुपये एवढी कमाई त्यांना होणार आहे.