Pune Successful Farmer : महाराष्ट्रात भाताची अर्थातच धान लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने खरीप हंगामात धान पीक उत्पादित होते. विदर्भ विभागात धानाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
खरं तर आपल्याकडे पांढऱ्या तांदळाची लागवड प्रामुख्याने केली जाते. पण अलीकडे काळ्या तांदळाची देखील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी लागवड करून पाहिली आहे. काळा तांदूळ हा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने याची बाजारात मोठी मागणी आहे.
यामुळे काळा तांदूळ शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यात एक नवीनचं प्रयोग समोर आला आहे. जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामधील मौजे चिखलगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क निळ्या रंगाच्या धानाची लागवड केली आहे.
लहू मारुती फाले असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. निळा तांदूळ हा प्रामुख्याने थायलंड आणि मलेशियामध्ये उत्पादित केला जातो. पण धानाचे हे पिक पुण्यातही उत्पादित होऊ शकते हे फाले यांनी दाखवून दिले आहे.
लहू यांनी केलेला हा प्रयोग पुणे जिल्ह्यातील पहिला-वहिला प्रयोग आहे. यामुळे सध्या परिसरात या प्रयोगाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अनेकांना फाले यांच्या या प्रयोगाची भुरळ पडली आहे.
फाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी खरीप हंगामात निळा भात पिकाची लागवड केली होती. हा भात रोवणी केल्यानंतर 110 ते 120 दिवसात काढण्यासाठी तयार झाला होता. या भाताचे पीक सहा ते सात फूट उंचीपर्यंत वाढते.
हा भात निळसर गडद जांभळ्या रंगाचा असतो. आता या धानाची हार्वेस्टिंग झाली आहे. फाळे सांगतात की, धानाचे हे पीक सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करण्यात आले असल्याने बाजारात याला मोठी मागणी आहे.
या धान पिकातून एकरी सोळाशे किलोपर्यंतचे उत्पादन मिळते. विशेष म्हणजे याला बाजारात 250 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे.
सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला असल्याने आणि या तांदुळात असणारे औषधी गुणधर्म पाहता शहरातील मंडळी या तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. त्यांनी सांगितलं की, यामध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आहेत.
हा तांदूळ ॲन्टीऑक्सीडंट आहे, यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी हा तांदूळ खूपच उपयोगी असल्याचे आढळून आले आहे. हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी देखील हा तांदूळ गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.