Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या नवनवीन प्रयोगासाठी चर्चेत राहतात. वास्तविक, या वर्षी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अजूनही सरासरीपेक्षा कमीच पाऊस आहे. मान्सूनचा हंगाम आता जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे.
मान्सूनच्या चार महिन्यांपैकी तीन महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र या तीन महिन्यांपैकी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांशी भागातील खरिपातील पिके अक्षरशः जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत.
मात्र अशा विपरीत परिस्थितीतही पुणे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधत आहेत. बारामती तालुक्यातील मौजे वाघळवाडी येथील शेतकऱ्याने देखील आपल्या अटके प्रयोगातून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
वाघळवाडी येथील शेतकरी सतीशराव संकुडे यांनी चक्क तुर्कीहून बाजरीचे बियाणे मागवून बाजरी लागवडीचा अभिनव प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून बाजरीचे पीक चांगले बहरले आहे. विशेष म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या या तुर्की येथील बाजरीच्या वाणाला तब्बल तीन फूट लांबीचे कणीस लागले आहे.
खरंतर सामान्य जातीच्या बाजरीला अर्धा फूट ते एक फूट दरम्यान कणीस लागते. मात्र या तुर्की जातीच्या बाजरीला तब्बल तीन फूट लांबीचे कणीस लागले असल्याने पंचक्रोशीत या प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
सतीशराव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जुलै च्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या नऊ एकर जमिनीत सोयाबीनची पेरणी केली. या पिकातच आंतरपीक म्हणून बाजरीचीही पेरणी करण्यात आली. बाजरीचे तुर्कीहून मागवलेले बियाणे त्यांनी नऊ एकर क्षेत्रात पेरले. आंतरपीक पद्धतीने सोयाबीन आणि बाजरीची लागवड केलेली असली तरी देखील दोन्ही पिके जोमदार बहरली आहेत.
बाजरीचे कणीस तब्बल तीन फूट लांबीचे आहे. यामुळे त्यांना यातून चांगले उत्पादन मिळणार आहे. खरंतर या जातीच्या बाजरीतून एकरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. मात्र त्यांनी आंतरपीक म्हणून लागवड केली असल्याने त्यांना एकरी 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार आहे. बाजरीची शेती अलीकडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
मात्र या युवा शेतकऱ्याने तुर्की येथून बियाणे मागवून केलेला बाजरी लागवडीचा हा प्रयोग बाजरीची लागवडी खालील क्षेत्र वाढवण्यास मदत करू शकतो. हे बाजरीचे बियाणे सतीशराव यांनी दीड हजार रुपये प्रति किलो या दराने खरेदी केले होते. मात्र आगामी काळात हे बाजरीचे बियाणे सतीशराव इतर शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देणार आहेत.
शिवाय त्यांनी इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील पारंपारिक पद्धतीनेच शेती न करता शेतीमध्ये बदल स्वीकारून वेगवेगळे प्रयोग राबवण्याचा सल्ला यावेळी दिला आहे. निश्चितच सतीश राव यांचा हा प्रयोग राज्यभरातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.