Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. यामुळे शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांच्या लागवडीतून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, आता अनेक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
पीक पद्धतीत देखील बदल केला जात आहे. पीक पद्धतीतील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतीमधून अलीकडे विविध नैसर्गिक संकट असतांनाही चांगली कमाई होऊ लागली आहे. दरम्यान, पुण्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने असाच एक बदल केला असून या शेतकऱ्याला आता वर्षाकाठी शेती मधून लाखो रुपयांची कमाई होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील अरुणराव मारुतीराव भागवत या प्रयोगशील शेतकऱ्याने सिंधीच्या झाडांची लागवड केली असून यामधून हा प्रयोगशील शेतकरी आता लाखो रुपयांची कमाई करत आहे. सिंधीच्या झाडांपासून निरा उत्पादन घेत अरुणराव वर्षाकाठी चार लाख रुपयांपर्यंतची कमाई करत आहेत.
खरेतर नीरा मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. एखाद्याला जर किडनी स्टोन असेल आणि त्याने जर निरा प्यायला सुरवात केली तर किडनीस्टोनचा प्रॉब्लेम हळूहळू दूर होत असल्याचा दावा केला जातो. यामुळे याला बारा महिने मागणी असते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर याला खूप मोठी मागणी असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन अरुणराव यांनी आपल्या चार एकर जमिनीत 1250 सिंधीची झाडे लावली आहेत. यातून अरुणराव यांना दररोज सहाशे लिटर एवढे निरा उत्पादन मिळत आहे.
तसेच त्यांना यातून वर्षाकाठी चार लाख रुपयांची कमाई होत आहे. अरुणराव यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून निरा उत्पादनाला सुरुवात केली आणि आजच्या घडीला हा व्यवसाय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे.
चार एकर जमिनीत त्यांनी दहा फूट अंतर ठेवून सिंधी झाडांची लागवड केली. लागवड केल्यानंतर साधारणपणे सात वर्षांनी त्यांना सिंधीच्या झाडांपासून निरा मिळू लागली. सध्या स्थितीला त्यांना या चार एकर बागेतून मोठ्या प्रमाणात निरा उत्पादन मिळत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सिंधी पासून मोठ्या प्रमाणात नीरा मिळते.
झाडांपासून निरा काढण्यासाठी सायंकाळी झाडाला मडके बांधले जाते आणि सकाळी हे मडके उतरवतात. यासाठी झाडांवर छेदन प्रक्रिया करावी लागते. शेतीचा व्यवसाय अलीकडे मोठा आव्हानात्मक बनला आहे. शेतीमधून शेतकऱ्यांना फारशी कमाई होत नाहीये.
घटत चाललेले पीक उत्पादन आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतीचा व्यवसाय परवडत नाहीये. पण जर अरुणराव यांच्यासारखा हटके प्रयोग केला गेला तर या व्यवसायातून चांगली कमाई होऊ शकते, हेच यातून सिद्ध होत आहे.