Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट तसेच दुष्काळ यामुळे शेती व्यवसाय करणे आता अवघड बनले आहे.
अहोरात्र काबाडकष्ट करून देखील अनेकदा शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. यामुळे नवयुवक शेतकरी बांधवांचा शेती व्यवसायापासून मोहभंग होत आहे. दरम्यान या चालू वर्षी देखील निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.
यंदा कमी पाऊस बरसला असल्याने खरीप हंगामातील पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. अशा या विपरीत परिस्थितीमध्ये मात्र पुण्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने लाखो रुपयांची कमाई केली आहे.
नीमगाव केतकी येथील पोपट घुसाळकर यांनी ही किमया साधली आहे. पोपट यांनी कमी पाण्यात पेरूचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे. पेरू बागेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना पहिल्याच बहारात एकरी 25 टन पर्यंतचे उत्पादन मिळाले आहे.
विशेष म्हणजे बाजारात पेरूला चांगला भावही मिळत असल्याने त्यांना 3 एकरातून आतापर्यंत तीस लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. अजून माल शिल्लक असल्याने त्यांना जवळपास 41 ते 42 लाख रुपयांपर्यंतची कमाई होण्याची आशा आहे. यामुळे सध्या पोपटरावांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
पोपट यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे अकरा एकर जमीन आहे. यात पाच एकर जमिनीवर पेरू लावला आहे तर चार एकर जमिनीवर डाळिंबाची बाग आहे. तसेच एक एकर जमिनीवर शेततळे बनवण्यात आले आहे. पोपट सांगतात की त्यांचा पारंपारिक व्यवसाय हा भांड्यांचा होता.
परंतु भांड्यांच्या व्यवसायाला बगल देत त्यांनी काहीतरी शेतीमध्येच नवीन करू या हेतूने पूर्ण वेळ शेती करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांच्या परिवाराने देखील मोठा हातभार लावला. जानेवारी 2022 मध्ये त्यांनी अहमदनगरच्या पाटेगाव पेरूच्या पिंक तैवान जातीची रोपे मागवली.
त्यांनी 3000 पेरूची रोपे मागवलीत आणि तीन एकर जमिनीवर या रोपांची लागवड करण्यात आली. पेरू लागवडीसाठी त्यांना जवळपास साडेसात लाख रुपयांचा खर्च आला. लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पहिल्याच बहारात त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. आतापर्यंत 60 टन माल त्यांनी काढला आहे.
व्यापाऱ्यांनी जागेवरच 51 रुपये प्रति किलो प्रमाणे त्यांच्या मालाची खरेदी केली असून आतापर्यंत त्यांना तीस लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे आणखी 15 टन माल शिल्लक आहे. यातूनही त्यांना जवळपास 11 ते 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे.एकंदरीत त्यांना तीन एकर जमिनीतून जवळपास 41 ते 42 लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार आहे.
एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळणार नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे पोपट यांनी कमी पाण्यात योग्य नियोजन करून पेरू बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न कमवून इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे. पोपट यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.