Pune Success Story : गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी गारपीट यांसारख्या एक ना अनेक संकटांमुळे बळीराजा भरडला जात आहे. यावर्षीही मान्सूनच्या सुरुवातीपासूनच निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळाला आहे.
सुरुवातीला मान्सूनचे उशिराने आगमन झाले आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पाहायला मिळाला. यामुळे खरिपातील पिके संकटात सापडली आहेत. यंदाचा खरीप हंगाम संपूर्ण वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी केलेला खर्च देखील भरून निघणार नाही असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
मात्र या अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील काही शेतकऱ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातही असाच एक नवीन प्रयोग पाहायला मिळाला आहे.
तालुक्यातील मौजे डोरलेवाडी येथील राहुल चव्हाण या फळबागायतदार शेतकऱ्याने पेरू लागवडीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. चव्हाण यांनी फक्त चार एकर जमिनीतून पेरू शेती करून तब्बल 12 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यामुळे सध्या चव्हाण यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे. राहुल यांनी सांगितल्याप्रमाणे, तीन वर्षांपूर्वी ते डाळिंबाचे उत्पादन घेत.
मात्र डाळिंब पिकावर आलेल्या तेल्या आणि मररोगामुळे त्यांना डाळिंबाची बाग नष्ट करावी लागली. डाळिंबाची झाडे काढल्यानंतर त्यांनी पेरू लागवड करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी व्होनार आणि तैवान पिंक या जातीच्या झाडांची चार एकर जमिनीवर लागवड केली. जवळपास 3 हजार रोपांची लागवड झाली.
यात व्होनार जातीची बाराशे रोपे छत्तीसगड येथील रायपूर येथून मागवली. तर उर्वरित 1800 रोपे तैवान पिंक जातीची बारामती परिसरातूनच घेतली. आत्तापर्यंत या पेरूच्या बागेतून त्यांनी दोनदा उत्पादन घेतले आहे. सध्या या पेरू बागेतून तिसरा तोडा काढला जात आहे. त्यांनी उत्पादित केलेला हा पेरू नेपाळसह भारतातील केरळ आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यात चांगल्या मागणीमध्ये आहे.
व्होनार या जातीच्या पेरूला पन्नास रुपये प्रति किलो पर्यंतचा भाव मिळत आहे आणि तैवान पिंक या जातीच्या पेरूला चाळीस रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळत आहे. व्होनार जातीचे पेरू लागवडीनंतर दीड वर्षांनी आणि तैवान पिंक जातीचे पेरू लागवडीनंतर एका वर्षांनी उत्पादन देण्यास सज्ज झालेत. पहिल्या वर्षी खर्च वजा जाता सात ते आठ लाख रुपयांची कमाई त्यांना झाली होती.
दरम्यान या दुसऱ्या वर्षातून त्यांना खर्च वजा जाता दहा ते बारा लाख रुपयांपर्यंतची कमाई झाली आहे. चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी व्होनार या जातीच्या पेरू रोपांची लागवड 13 बाय सहा या अंतरावर केली आहे. तसेच तैवान पिंक या जातीच्या रोपांची लागवड आठ बाय पाच या अंतरावर केली आहे.
या पेरूच्या बागेला त्यांनी शेणखत आणि बेसल डोस दिला आहे. शिवाय वेळोवेळी ड्रीप फर्टीलायझर दिले आहे. पाण्याचे ड्रीपच्या साह्याने योग्य व्यवस्थापन केले आहे. यासोबतच झाडांची वाढ होण्यासाठी वेळोवेळी छाटणी देखील करण्यात आली आहे. एकंदरीत पेरू बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना लाखो रुपयांची कमाई झाली आहे.