Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा कायमचा निकाली काढण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरासहित जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) जुलै अखेरीस या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या 136 किमी लांबीच्या कामासाठी कंत्राटदार अंतिम करणार आहे. कंत्राटदार अंतिम झाल्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.
MSRDC चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पाचे बांधकाम हे पावसाळ्यानंतर सुरू होण्याची अपेक्षा आहे. अर्थातच, येत्या काही महिन्यात पुणे रिंग रोडच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकल्पाचे भूमिपूजन कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान आता या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होणार अशी माहिती रस्ते विकास महामंडळाकडून समोर आली असल्याने पुणेकरांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे.
खरे तर या प्रकल्पाचे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. म्हणजे या प्रकल्पात ईस्टर्न आणि वेस्टर्न कॉरिडॉरचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी यावर्षी मार्चमध्ये विविध कंपन्यांकडून 19 निविदा सादर झाल्या होत्या.
दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आता बोलींचे मूल्यांकन केले जात आहे. हा प्रकल्प नऊ पॅकेजमध्ये पुर्ण केला जाणार असल्याने वेगवेगळ्या भागांसाठी पाच कंपन्यांची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 17 जानेवारी रोजी निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि 1 मार्च ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती.
सादर केलेल्या निविदा 26 मार्च रोजी उघडण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमुळे मूल्यांकनास विलंब झाला आहे. पश्चिम रिंग रोडचे काम एकूण पाच पॅकेज मध्ये आणि पूर्व रिंग रोडचे काम एकूण चार पॅकेज मध्ये होणार आहे.
या प्रकल्पाचे काम यंदाच्या पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि डिसेंबर 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असे बोलले जात आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत बोलायचं झालं तर पश्चिम रिंग रोड मधील जवळपास सर्वच गावांमध्ये जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. पश्चिम भागातील काही मोजक्याच गावातील जमिनीचे संपादन बाकी आहे.
दुसरीकडे पूर्व भागातील रिंग रोड साठी देखील युद्ध पातळीवर जमीन संपादनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता हे काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी जवळपास 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, ज्यामध्ये 87 गावांमधील 1,900 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.
एकंदरीत पुणे रिंग रोड चे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. याचे बांधकाम सुरू झाल्यानंतर नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे.